संकटकालीन साहाय्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात सुसंवाद असावा ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

संजय राऊत

मुंबई – नवीन सत्तासमीकरणांचा इथे विषय येत नाही. केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्ष नसावा. केंद्र सरकार राज्याचे पालक म्हणून काम करत असते. राज्यांच्या संकटकाळात पंतप्रधानांनी साहाय्य करावे, ही राज्यांची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात सुसंवाद असावा, ही आमची भूमिका कायम राहिली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक भेटीवर प्रसिद्धीमाध्यमांपुढे व्यक्त केली.

या वेळी संजय राऊत म्हणाले, ‘‘जेव्हा ठाकरे-मोदी भेटतात, तेव्हा चर्चा तर होणारच. ज्यांना राजकीय अर्थ काढायचे आहेत, त्यांना काढू देत. नरेंद्र मोदी यांच्याविषयी आम्हाला नेहमीच आदर आहे. ठाकरे परिवार आणि मोदी यांचे जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी मोदी यांच्या मनात किती आदर आहे, हे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे. संघर्ष कायम नसतो. केव्हातरी संघर्षाला पूर्णविराम द्यावा लागतो. आज पंतप्रधानांनी महाराष्ट्राचे प्रश्‍न ऐकून घेतले आहेत, तर संघर्षाची भाषा कशाला ? संवाद वाढत आहे आणि तो वाढत रहावा.’’