सोलापूर येथे ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळे’चे आयोजन
सोलापूर – स्वसुखांच्या पलिकडेही आपले जीवन आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात आता खारीचा वाटा नाही, तर सिंहाचा वाटा उचलण्याची वेळ आली आहे. धर्मांतर आणि विविध प्रकारचे ‘जिहाद’ ही राष्ट्रावरील मोठी संकटे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो. त्यामुळे साधना करतांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया समजून घ्या, तसेच राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी दायित्व घेऊन कार्य करायला शिका. ‘हिंदु राष्ट्राचे आदर्श संघटक होण्यासाठी अर्जुनाप्रमाणे स्वत:मध्ये कृतज्ञताभाव निर्माण करा’, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या जिल्ह्यांतील धर्मप्रेमींसाठी नुकतीच ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’ घेण्यात आली. त्यामध्ये त्या मार्गदर्शन करत होत्या.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन धर्मप्रेमी सौ. आरती जाधव यांनी, तर कार्यशाळेचा उद्देश सौ. अर्चना पाटील यांनी सांगितला. या वेळी ‘हिंदु राष्ट्र संघटकाची आचारसंहिता’ याविषयी समितीच्या श्रीमती अलका व्हनमारे यांनी, तर ‘हिंदु राष्ट्राची संकल्पना’ याविषयी समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी मार्गदर्शन केले. या वेळी श्रीमती अलका व्हनमारे म्हणाल्या की, संघटनाच्या कार्यात बाधा निर्माण करणारे दोष दूर केल्यास आदर्श हिंदु संघटक होता येते. या वेळी धर्मप्रेमींनी स्वरक्षण प्रशिक्षण, सामाजिक माध्यमे आणि धर्मशिक्षणवर्ग यांद्वारे अधिकाधिक अध्यात्मप्रसार करण्याचा निश्चय केला.
क्षणचित्र : कार्यशाळेत सहभागी धर्मप्रेमींना राष्ट्र आणि धर्म यांविषयी कृतीप्रवण होण्याविषयी विचारले असता त्यांनी ‘जय श्रीराम’ या संदेशाद्वारे अनुमोदन दिले.
हिंदु राष्ट्र स्थापनेची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी क्षमतेचा पूर्ण वापर करणे ही साधनाच ! – मनोज खाडये, गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक
तिसर्या महायुद्धाच्या माध्यमातून तीव्र आपत्काळ आपल्यासमोर ‘आ’ वासून उभा आहे. त्यामुळे आपल्याला भगवंताचे भक्त होण्याविना पर्याय नाही. कोरोनाच्या महामारीतून मुक्त होण्यासाठी मेघालय येथील प्रत्येक नागरिकाने प्रार्थना करण्यासाठी वेळ निश्चित करून कृती केली. यावरून आपल्याला खरा आधार ईश्वराचा आहे, हे आपल्या लक्षात येईल. सध्या आरोग्य क्षेत्रात चालणारा प्रकार घृणास्पद आहे. जागतिक आरोग्य संघटनेची व्याख्या पूर्वी ‘मानसिक, शारीरिक आणि बौद्धीक विकास’, अशी होती, त्यात आता पालट होऊन ती आता ‘मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकास म्हणजे खरे आरोग्य !’, अशी झालेली आहे. यावरून आपल्याला अध्यात्माचे आणि साधनेचे महत्त्व लक्षात येते. आपल्या परिचितांना राष्ट्र आणि धर्म यांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करा. हिंदु राष्ट्र स्थापनेची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करणे, ही साधना आहे. प्रतिकूल काळातही राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्याची संधी आपल्याला लाभली, याविषयी कृतज्ञ राहून या कार्यात यथायोग्य योगदान देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायला हवा. |
अभिप्राय
श्री. किरण गोडसे – हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची नेमकी दिशा या कार्यशाळेच्या माध्यमातून लक्षात आली, तसेच आपल्यातील स्वभावदोष दूर करणे किती आवश्यक आहे, हेही लक्षात आले. हिंदूसंघटनाच्या कार्यात मी सहभागी होण्याचा प्रयत्न करीन.
श्री. विजय देवकर – स्वरक्षण प्रशिक्षण वर्ग चालू करण्यासाठी माझ्या व्यायाम शाळेत पुष्कळ युवक आहेत. मी त्यांना संपर्क करून त्यांच्यासाठी वर्ग चालू करण्याचा प्रयत्न करतो.
श्री. संतोष पिंपळे, धाराशिव – आमच्या भागातील ४ ते ५ मंदिरांमध्ये नामजप ध्वनीक्षेपकावर लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
श्री. भास्कर बिंगी – मी आतापर्यंत स्वत:साठी पुष्कळ केले. यापुढे आता मी समष्टीसाठी कृती करणार आहे.
श्री. मल्लिकार्जुन पडशेट्टी – मला कार्यशाळा पुष्कळ आवडली. कार्यशाळा झाल्यावर त्वरित मी माझ्या दोन मित्रांना धर्मशिक्षणवर्गात सहभागी होण्यासाठी सांगितले.
श्री. विशाल ढगे – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करण्याचा प्रयत्न करेन.