जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी यांचे निलंबन !

विलगीकरण कक्षाची शाळकरी मुलाकडून स्वच्छता केल्याचे प्रकरण

बुलढाणा – जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात १५ कोरोनाबाधित रुग्ण असतांना तेथील स्वच्छतागृहाची स्वच्छता ८ वर्षाच्या एका मुलाकडून करून घेण्यात आली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर त्याची गंभीर नोंद घेत जिल्हाधिकारी एस्. राममूर्ती यांनी मारोड येथील ग्रामपंचायत कर्मचारी यांना, तर प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना दोषी ठरवून निलंबित केले आहे. ‘प्रशासनाच्या वतीने या प्रकरणाची पुढील चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल’, असे सचिन जगताप यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ‘या प्रकरणाची नोंद घेऊन त्यांनी गटविकास अधिकारी, जिल्हाधिकारी आणि उत्तरदायी कर्मचारी यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी’, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली आहे.