बुलढाणा येथे विलगीकरण कक्षाची शाळकरी मुलाकडून स्वच्छता !

स्वच्छता करण्यासाठी मुलाला धमकावले !

  • कोरोनाच्या आगामी तिसर्‍या लाटेत लहान मुलांना धोका असतांना विलगीकरण कक्षाची मुलांकडून स्वच्छता करवून घेणे, हे प्रशासनाला लज्जास्पद  ! यासाठी अन्य कामगारांची नियुक्ती करून स्वच्छता करवून का घेतली नाही ? उद्या त्या मुलाच्या जीवावर बेतल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

  • प्रशासनच जर लहान मुलांना कामाला लावत असेल, तर बालकामगारांचा प्रश्‍न कधीतरी सुटेल का ? मुळातच राज्यात बालकामगारांना कामाला ठेवण्यास बंदी असतांना संबधितांवर सरकारने कठोर कारवाई करायला हवी !

बुलढाणा – जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात १५ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. असे असतांना तेथील स्वच्छतागृहाची स्वच्छता ८ वर्षाच्या एका मुलाकडून करून घेण्यात आली. या मुलाला स्वच्छता करण्यासाठी धमकावण्यात आले होते. या प्रकरणी प्रशासनाच्या विरोधात नागरिक संतप्त आहेत. हा मुलगा इयत्ता तिसरीत शिकत असून त्याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे.

१. बुलढाण्याचे जिल्हाधिकारी संग्रामपूर तालुक्याच्या दौर्‍यावर असतांना ते मारोड या गावात येतील, या भीतीने पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या आदेशाने तात्काळ येथील विलगीकरण कक्षाची स्वच्छता करण्यात आली. (याचाच अर्थ विलगीकरण कक्षाची नियमितपणे स्वच्छता होत नाही, असेच लक्षात येते. जिल्हाधिकारी दौर्‍यावर आले नसते, तर कक्षाची स्वच्छता झालीच नसती. अस्वच्छतेमुळेही कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, याचे जराही भान न ठेवता आंधळेपणाचा कारभार करणार्‍या संबंधित दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)

२. गावात कुणीही नसल्याने प्रशासनाने या बालकाला स्वच्छता करण्यासाठी ५० रुपयांचे आमीष दाखवले.

३. त्या बालकाने नकार दिल्यावर त्याला काठीने मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे बालकाने विलगीकरण कक्षात प्रवेश करून शौचालयाची स्वच्छता केली. या वेळी विलगीकरण कक्षात १५ कोरोनाबाधित रुग्ण होते.

४. सामाजिक माध्यमातून याचा व्हिडिओ प्रसारित होताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांना निवेदन देऊन या अपप्रकाराविषयी चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. (मुळातच अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वतःहून नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)

५. ‘हा बालमजुरीचा प्रकार असून यात जिल्हाधिकार्‍यांसह दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे नोंद झाल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही’, असे ज्येष्ठ समाजसेवक भाऊ भोजने यांनी म्हटले आहे.

६. एका पत्रकाराने संग्रामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पाटील यांच्याशी संपर्क करून या घटनेविषयी विचारणा केली. त्या वेळी त्यांनी ‘या घटनेविषयी मला अधिकृत माहिती नसून अशा बातम्या लावून कशाला आमची सुट्टी खराब करता’, असे उत्तर दिले. (कोरोनाची सद्य:स्थिती चिंताजनक असतांनाही अशी उर्मट उत्तरे देणार्‍या अधिकार्‍यांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक) तसेच प्रशासनाचा कोणताही अधिकारी या घटनेविषयी बोलण्यास सिद्ध नाही.