सोलापूर विद्यापिठाच्या ‘विशेष सुरक्षित मास्क’चे ‘पेटेंट’ भारत सरकारच्या ‘पेटेंट’ नियतकालिकात प्रसिद्ध !

कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांची माहिती

अँटीमायक्रोबायोल नॅनो पार्टिकल बेस्ट फेस मास्क

सोलापूर – पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या संसर्गापासून बचाव होण्यासाठी विशेष ‘मास्क’ची निर्मिती केली असून त्याचे ‘पेटेंट’ भारत सरकारच्या ‘पेटेंट’ कार्यालयाच्या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

विद्यापिठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉ. विकास पाटील आणि त्यांचे सहकारी संशोधक यांनी ‘अँटीमायक्रोबायोल नॅनो पार्टिकल’ संशोधन प्रयोगशाळेत सिद्ध करून त्याचा मास्कसाठी उपयोग केला आहे. त्यापासून ‘अँटीमायक्रोबायोल नॅनो पार्टिकल बेस्ट फेस मास्क’ची निर्मिती करण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर १ सहस्र विशेष सुरक्षित मास्कची निर्मिती करण्यात आली असून हे मास्क डॉक्टर, रुग्णालये, सामाजिक संस्था यांना वितरित करण्यात आले आहेत, तसेच ‘आय.सी.एम्.आर्.’, नवी देहली आणि ‘एन्.आय.व्ही.’ पुणे, मुंबई यांनाही पाठवण्यात आले आहेत.