महावितरणच्या नावाने बनावट लघुसंदेश पाठवून ग्राहकांची फसवणूक !

नागरिकांनी बनावट लघुसंदेशाला प्रतिसाद न देण्याचे पोलिसांचे आवाहन

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर – ‘आपले मागील महिन्यातील देयक थकीत असून आतापासून तुमची वीज खंडित करण्यात येत आहे. ही कारवाई थांबवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधा’, असे बनावट लघुसंदेश शहरातील ग्राहकांच्या वैयक्तिक भ्रमणभाषवर येत आहेत. संबंधित क्रमांकावर संपर्क केला असता, ते बोलण्यात गुंतवून माहिती काढत आपोआप ‘ओटीपी’ सिद्ध होतो आणि त्यावरून बँक खात्यातील रक्कम काढून घेतली जात आहे. असे बनावट लघुसंदेश किंवा भ्रमणभाष आल्यास त्याला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन सोलापूर येथील सायबर पोलीस निरीक्षक श्रीशैल जगा यांनी केले आहे.

महावितरणकडून भ्रमणभाष क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच सिस्टीमकडून लघुसंदेश पाठवण्यात येत आहेत, तसेच अधिकृत संदेशमधून कुणालाही अधिकार्‍यांच्या वैयक्तिक भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवले जात नाही. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रामुख्याने सतर्क रहावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

प्रारंभी हिंदी भाषेतून येणारे भ्रमणभाष हे बनावट आहेत, असे महावितरणने सांगितले. आता एआयच्या साहाय्याने मराठी भाषेत संदेश आणि संवाद साधत नागरिकांची फसवणूक होत आहे. अवघ्या ५ मिनिटांत बँक खाते रिकामे होते.

संपादकीय भूमिका :

केवळ जनतेला आवाहन करण्याऐवजी असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी कठोर उपायोजना होणे आवश्यक आहे !