दुर्घटनेला ५ वर्षे पूर्ण होऊनही पीडित हानीभरपाईपासून वंचित !

डोंबिवली येथील ‘प्रोबेस एंटरप्राईजेस’ या रासायनिक कारखान्यातील दुर्घटनेचे प्रकरण

दुर्घटना होऊन ५ वर्षे उलटली, तरी पीडितांना हानीभरपाई न मिळणे हे अतिशय गंभीर आहे !

२६ मे २०१६ या दिवशी  झालेल्या ‘प्रोबेस एंटरप्राईजेस’ या रासायनिक कारखान्यातील दुर्घटनेचे छायाचित्र 

ठाणे – डोंबिवली औद्योगिक वसाहतीत असलेल्या ‘प्रोबेस एंटरप्राईजेस’ या रासायनिक कारखान्यात २६ मे २०१६ या दिवशी सकाळी ११.४० वाजता शक्तीशाली स्फोट झाला होता. या घटनेला ५ वर्षे पूर्ण झाली; मात्र या दुर्घटनेतील पीडित अद्यापही हानीभरपाईपासून वंचित आहेत, तसेच शासनाने दुर्घटनेचा चौकशी अहवाल गेल्या ५ वर्षांपासून दडवून ठेवला आहे, असे पीडित लोकांचे म्हणणे आहे. या स्फोटात एकूण १३ जण मृत्यूमुखी पडले, तर २०० हून अधिक जण घायाळ झाले होते.

१. कारखान्याच्या आसपासच्या इमारती, दुकाने, शाळा, वाहने आणि आस्थापने यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. घटनेच्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्री अन् बडे अधिकारी यांनी घटनास्थळाची पहाणी केली होती.

२. फडणवीस यांनी या स्फोटाची ठाणे जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ जाणकारांची चौकशी समिती नेमून ही समिती एका मासात शासनास अहवाल सादर करेल, तसेच या स्फोटात ज्या मालमत्ताधारकांची हानी झाली आहे अशांना भरपाई मिळेल, असे आश्‍वासन दिले होते.

३. कल्याण तहसीलदार कार्यालयाने मालमत्तेची हानी झालेल्या २ सहस्र ६०० पीडितांचे पंचनामे केले होते. त्यात ७ कोटी ४३ लाख २७ सहस्र ९९० रुपये एवढी रक्कम पीडितांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मिळण्यासाठी प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आला होता; मात्र अद्याप हानीभरपाई मिळाली नसल्यामुळे पीडितांकडून संताप व्यक्त होत आहे.

४. ‘प्रोबेस’ दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कारखान्याच्या मालकाने २ लाख रुपये प्रत्येकी साहाय्य केले होते, तर घायाळ झालेल्यांच्या उपचाराचा व्यय केला होता; मात्र परिसरातील अन्य हानी झालेल्या लोकांना भरपाई कधी मिळणार याकडेच पीडितांचे लक्ष लागले आहे.