गोव्यात गेल्या २४ घंट्यांत ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ५४९ नवीन रुग्ण

पणजी – गोव्यात २५ मे या दिवशी ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील १९ रुग्णांचा, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील ११, तर खासगी रुग्णालयातील ५ रुग्णांचा समावेश होता. यामुळे कोरोनामृतांची आतापर्यंतची एकूण संख्या २ सहस्र ४६० झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ५ सहस्र ४४ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र ५४९ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३०.७१ टक्के आहे. हे प्रमाण गेल्या काही दिवसांतील सर्वांत अल्प आहे. दिवसभरात २ सहस्र ८२ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १४४ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून १५ सहस्र ७०६ झाली आहे.