कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी सिद्धतेला प्रारंभ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २५ मे (वार्ता.) – कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी साधनसुविधा सिद्ध करण्यात येत आहे. ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ (एम्स्) यांनी शिफारस केल्याप्रमाणे बालरोगतज्ञांना कोरोनाबाधित मुलांवर उपचारांच्या नियमावलींविषयी ५ ते १० जून या कालावधीत प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग झालेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालये यांच्यासाठी समान नियमावली सिद्ध करण्यात येत आहे. ‘एम्स’ने शिफारस केलेल्या या नियमावलीविषयी (एस्.ओ.पी.) गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा बालरोगतज्ञ विभाग बालरोगतज्ञांना प्रशिक्षण देणार आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी शिक्षण खाते, गोवा राज्य एड्स कन्ट्रोल सोसायटी आणि महिला अन् बाल कल्याण खाते यांमधील समुपदेशक यांचे सहाय्य घेतले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या आणि घरी अलगीकरणात असलेल्या मुलांवर कठोरपणे देखरेख ठेवली जाणार आहे.’’

स्तनपान करणार्‍या मातांना कोरोना लसीकरणासाठी प्राधान्य

स्तनपान करणार्‍या मातांना (मूल २ हून अल्य वर्षांचे असेल आणि विविध व्याधींनी ग्रस्त असलेली माता यांना) कोरोना लसीकरणासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. ४५ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी असलेले कोरोना लसीचे डोस स्तनपान करणार्‍या मातांसाठी वापरण्याची केंद्राकडे अनुमती मागितली आहे.

४५ वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींसाठी आरक्षित असलेल्या लसीच्या २ लक्ष ८० सहस्र डोसांपैकी १ लक्ष डोस १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी वापरण्याची अनुमती केंद्रशानाकडे मागितली आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी केवळ ६ सहस्र डोस राज्यशासनाकडे उपलब्ध आहेत आणि या गटासाठी ३६ सहस्र डोस असलेला दुसरा साठा १ जून या दिवशी मिळणार आहे.

राज्यशासनाने कोरोना प्रतिबंधक लसनिर्मिती करणार्‍या २ निरनिराळ्या आस्थापनांकडे अनुक्रमे लसीचे ५ लक्ष आणि १० लक्ष डोस मिळवण्यासाठी संपर्क साधला आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील ११ टक्के रुग्ण

राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील ११ टक्के रुग्ण आहेत. १८ वर्षांखालील एकूण ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि हे सर्व रुग्ण विविध व्याधींनी ग्रस्त होते.

१२ वी इयत्तेच्या परीक्षेविषयी अजून निर्णय नाही

१२ वी इयत्तेच्या अंतिम परीक्षेविषयी अजूनही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे दिली. मुख्यमंत्र्यांनी २३ मे या दिवशी गोवा शालांत मंडळाची १० वी इयत्तेची परीक्षा रहित करण्याची घोषणा केली होती आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेसंबंधी २ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे म्हटले होते.