रामनाथी आश्रमातील श्री. नीलेश चितळे यांच्याविषयी त्यांची पत्नी सौ. नंदिनी चितळे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

​‘रामनाथी आश्रमात सेवा करणारे श्री. नीलेश चितळे यांचा वैशाख शुक्ल पक्ष द्वादशीला (२३.५.२०२१ या दिवशी वाढदिवस झाला.) परात्पर गुरुमाऊलीच्या कृपेने श्री. नीलेश यांच्या सहवासात मी त्यांचे अनेक गुण अनुभवले. आमचे लग्न झाल्यापासून ते मला नेहमीच साधनेला प्रोत्साहन देतात. ते मला कधीच मानसिक स्तरावर जपत नाहीत. योग्य ते सांगून योग्य तेच करायला प्रवृत्त करतात. त्यांच्या वाढदिवशी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.

श्री. नीलेश चितळे
सौ. नंदिनी चितळे

१. नीटनेटकेपणा

​श्री. नीलेश यांचे रहाणीमान नीटनेटके आहे. ते प्रतिदिन धुतलेले कपडे इस्त्री करूनच घालतात.

२. उत्तम निरीक्षणक्षमता

श्री. नीलेश यांची निरीक्षणक्षमता अफाट आहे. एखाद्या छोट्या प्रसंगातही त्यांना अनेक बारकावे लक्षात आलेले असतात. रस्त्यावरून जातांना आजूबाजूचा परिसर, दुकानांतील घडामोडी, आपत्कालीन प्रसंग, पशू-पक्षी, सेवा, तांत्रिक अडचणी इत्यादी अनेक गोष्टींचे बारकावे त्यांच्या लक्षात येतात. ते जाणून घेण्यासाठी त्यांनी वेगळा वेळ दिलेला असतो, असे नाही. सहजच एका दृष्टीत त्यांना पुष्कळ बारकावे लक्षात येतात. त्याला अनुसरून त्यांची कृतीही झालेली असते. त्यांनी आतापर्यंत कुठलेच व्यावहारिक काम केलेले नाही; परंतु आता काही वेळा अशी कामे करावी लागतात. त्या वेळी ते प्रत्येक काम अभ्यासपूर्ण आणि परिपूर्ण करतात. ‘हा दैवी गुण देवाने त्यांना भरभरून दिला आहे’, असे मला वाटते. याविषयी त्यांचे कौतुक केल्यावर ते त्यांना स्वतःचे निरीक्षण जमत नसल्याची खंत व्यक्त करतात.

३. समयसूचकता आणि सतर्कता 

सहा मासांपूर्वी आमच्या निवासी संकुलातील एक व्यक्ती दुसर्‍या माळ्यावरून खाली पडली. ती व्यक्ती जेथून पडली, त्या खाली आमचीही गच्ची आहे. बाजूच्या खोलीत श्री. नीलेश होते. त्यांना केवळ सावलीसारखे काहीतरी वरून खाली गेल्याचे जाणवले. त्यामुळे ते लगेच गच्चीत गेले. ‘व्यक्ती पडली आहे’, हे लक्षात आल्याबरोबर ते त्यांच्या साहाय्यासाठी खाली गेले आणि मला त्यांच्या कुटुंबियांना कळवायला सांगितले. त्यांनी त्या व्यक्तीवर प्राथमिक उपचार केले आणि रुग्णवाहिकेला बोलवायला सांगितले. रुग्णवाहिकेस घर सापडत नव्हते, तर ते स्वत: रस्त्यात जाऊन थांबले आणि त्यांना रुग्णालयामध्ये पाठवले. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीच्या अन्य नातलगांनाही निरोप द्यायला सांगितले. त्यांना या सर्व गोष्टी पटापट आणि तत्परतेने करतांना बघून मला आश्‍चर्य वाटत होते. अशा प्रसंगाला ते यापूर्वी कधीही सामोरे गेले नव्हते. हे सर्व करतांना पाऊस पडत असल्याने ते ओलेचिंब झाले होते; पण तरीही ते सर्व करत होते.

४. प्रेमभाव 

श्री. नीलेश यांच्यात मुळातच प्रेमभाव आहे. त्यामुळे त्यांना निसर्ग, पशू-पक्षी, झाडे, समाजातील व्यक्ती, कुटुंबीय, साधक या सर्वांविषयी प्रेम वाटते. वृद्ध साधकांची काळजीही ते दायित्वाने घेतात. आपत्काळात कुटुंबियांची सोय व्हावी, यासाठी ते त्यांना सांगून आपत्काळाची जमेल तशी सिद्धता करत असतात. मी आजारी असल्यावर, तसेच अन्य वेळीही ते माझी आईप्रमाणे काळजी घेतात.

५. नियोजनबद्धता

कुठलीही कृती करतांना ते नियोजन करूनच करतात. आश्रमात पोचण्याची आणि आश्रमातून निघण्याची त्यांची वेळ निश्‍चित असते. अगदी छोट्या छोट्या सेवांमध्ये ती सेवा कशी करायची, त्याचे टप्पे त्यांनी ठरवलेले असतात आणि ते तसे करतात. ‘त्यामुळे त्यांचे काही राहून गेले आहे’, असे क्वचितच होते.

६. आवड निवड अल्प असणे

घरी कधी त्यांना खायला काय बनवायचे, असे विचारल्यावर ते ‘तू बनव, मला काहीही चालेल’, असे सांगतात. कधी काही खरेदी करायला गेल्यावरही ते मला जे आवडते, तेच घेतात.

७. तत्त्वनिष्ठता

ते जे योग्य आहे, तेच करतात. इतरांनाही ते मानसिक स्तरावर न जपता त्यांना योग्य तेच सांगतात. यामुळे त्यांना कधी कुठल्याही प्रसंगाचा मानसिक त्रास होत नाही. ते मनाने स्थिर असतात.

८. परिस्थिती स्वीकारणे

त्यांना अनेक शारीरिक त्रास होत असतात. कधी त्वचेशी संबंधित, पायाशी संबंधित वेदना, कधी पोटाशी, तर कधी ‘अ‍ॅलर्जी’मुळे त्रास होतो. ही परिस्थिती स्वीकारून वैद्य सांगतील, ते उपचार ते मन लावून करत असतात. या उपराचारांमधे माझा वेळ जायला नको; म्हणून ते अगदी आवश्यक असल्यासच माझे साहाय्य घेतात. त्यांना उपचार करतांना बघून मला अनेकदा वाटते, ‘किती संयमाने हे करत असतात.’

९. निसर्गप्रेम

श्री. नीलेश यांचे निसर्गावर पुष्कळ प्रेम आहे. या प्रेमामुळे त्यांना निसर्गाविषयी बरीच माहितीही आहे.

अ. नाशिक येथे असतांना ते प्राणी मित्र संघटनेत होते. त्यांना अनेक पशू-पक्षी ओळखता येतात.

आ. नीलेश यांनी परसात येणार्‍या पक्षांना खाऊ खायला आणि पाणी प्यायला दोन मातीची भांडी ठेवली आहेत. प्रत्येक दिवशी ते मला त्यांच्यासाठी खाऊ ठेवायला सांगतात आणि स्वतः पाणी ठेवतात.

इ. झाडाची पाने (उदा. कोरफड, कडीपत्ता) तोडतांना ते मला प्रार्थना करून आणि त्या झाडाशी संवाद साधून तोडायला सांगतात. त्यांनाही कधी पाने तोडावी लागली, तर ते त्या झाडाला प्रेमाने समजावून सांगतात आणि मग पाने तोडतात.

१०. समर्पणभावाने अभ्यासपूर्ण कृती करणे

एखादी सेवा असो किंवा काम असो, ते ती १०० टक्के स्वतःची क्षमता वापरून अभ्यासपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. ‘ती कृती योग्यच झाली पाहिजे’, असा त्यांना ध्यास असतो. त्यांच्या सेवेच्या पद्धतीवर प्रसन्न होऊन त्यांना संतांकडून प्रसाद मिळाला आहे.

११. मध्यमा वाणीतून जप करण्याचा प्रयत्न करणे

काही नामजप विशिष्ट संख्येत पूर्ण करायचे असतात. असे नामजप आम्ही दोघे करत असतो. त्या वेळी त्यांचा लवकर पूर्ण होतो. मला वेळ लागतो. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘तुमचा नामजप इतक्या लवकर पूर्ण कसा होतो ?’’ त्या वेळी त्यांनी सांगितले, ‘‘मी मध्यमा वाणीतून नामजप करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे वैखरीतील नामजपापेक्षा तो लवकर पूर्ण होतो.’’ तसा नामजप कसा करायचा, ते त्यांनी मला शिकवून  सांगितले, ‘‘तूही मध्यमा वाणीतून नामजप करण्याचा प्रयत्न करत जा.’’

१२. श्री. नीलेश यांचा शिवाविषयी जाणवणारा भाव दर्शवणारी सूत्रे

​त्यांच्या मनात शिवाविषयी प्रचंड भाव आहे. याविषयी त्यांनी एका संतांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तुमची मागच्या जन्मीची शिवाची साधना आहे.’’

अ. आम्ही झोपतो त्या खोलीत श्री. नीलेश यांनी ३ फुटांचे शिवाचे मोठे चित्र लावले आहे. रात्री झोपतांना आणि सकाळी उठल्यावर ‘शिवाचे दर्शन व्हावे’, असे त्यांना वाटते.

आ. आम्ही घरी असतांना आणि आवरतांना त्यांनी शिवाशी संबंधित श्‍लोक आणि भजने लावलेली असतात. नीलेश तल्लीन होऊन ती ऐकत आवरत असतात.

इ. दिवसभरातील काळानुसार नामजप पूर्ण झाल्यावर ते शिवाचा नामजप करतात.

ई. अनेक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणच्या अनेक वस्तू, उदा. शिवाला वाहिलेली माळ, भस्म, तेथील दगड, माती, फुले, जानवे, डमरू इत्यादी वस्तू त्यांनी संग्रहित केल्या आहेत. मधेमधे त्या वस्तू बघून ते आनंदी होतात आणि वेगळ्याच विश्‍वात गेल्यासारखे वाटतात.

उ. साधनेच्या आरंभी नीलेश सूक्ष्म संदर्भातील सेवा करायचे. त्या वेळीही त्यांना अशी अनुभूती अनेकदा यायची की, शिवाला प्रार्थना केल्यावर समोरील साधकाला त्रास देणारी वाईट शक्ती शांत व्हायची.

१३. जाणवलेले पालट

१३ अ. अपेक्षा अल्प होणे : पूर्वी एक पत्नी म्हणून त्यांच्या माझ्याकडून थोड्या अपेक्षा असायच्या; पण आता त्याही अल्प झाल्याचे जाणवते.

१३ आ. साधनेतील स्थिरता वाढणे : ते स्थिर असल्यामुळे संतांनीही मला त्यांच्याशी साधनेच्या संदर्भात बोलून त्यांचे साधनेत साहाय्य घ्यायला सांगितले आहे.

१३ इ. साधनेची तळमळ वाढणे : सेवा किंवा घरातील कामे करतांना त्यांचा एकसारखाच भाव असतो. ‘त्यांची साधना सतत चालू आहे’, असे जाणवते.

१३ ई. अंतर्मुखता वाढणे : पूर्वी त्यांना त्यांचे काही चुकलेले सांगितल्यास स्वतःचे योग्य वाटत असे. आता स्वीकारून ते स्वतःत पालट करण्याचे प्रमाण वाढले आहे.

१३ उ. संतांनी केलेले कौतुक : एका संतांनी सांगितले, ‘‘त्यांचा आध्यात्मिक त्रास अल्प झाला आहे. त्यांचा तोंडवळा आनंदी दिसतो आणि त्याची साधना चांगली चालू आहे.’’

– सौ. नंदिनी चितळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक