नक्षलग्रस्त परिसरातील मुर्गभुशी गावात सरपंच भाग्यश्री लेखमी यांनी दुचाकीवरून फिरून केला लसीकरणाचा विक्रम !

आदिवासींमधील भ्रामक समजूत दूर केली !

नागपूर – येथून ३५५ किलोमीटरवर दाट अरण्यातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरील नक्षलग्रस्त परिसरात मुर्गभुशी हे गाव आहे. कोठी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत हे गाव येते. या गावात ‘लस घेतली की, आजारी पडतो आणि रुग्णालयात गेलो की, किडनी काढून घेतात’, अशी आदिवासींमधील भ्रामक समजूत होती. कोठी ग्रामपंचायतीच्या तरुण सरपंच भाग्यश्री लेखामी यांनी ती दूर करत स्वतःच्या दुचाकीवरून पाड्यापाड्यांवर फिरत लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

वर्ष २००६ पर्यंत या गावात सरपंच नव्हते. नक्षलवाद्यांच्या दबावामुळे गावात एकही योजना नव्हती. भाग्यश्री यांच्या आई अंगणवाडी सेविका आणि वडील शिक्षक यांमुळे त्यांना लहानपणापासूनच सामाजिक कामाची आवड होती. लस घेतल्यावर होणारा वरील अपसमज दूर करण्यासाठी लोकांशी संवाद साधत ज्येष्ठ नागरिकांचे १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे श्रेय सरपंच भाग्यश्री, आरोग्य कर्मचारी आणि लोकबिरादरी प्रकल्पाचे कार्यकर्ते यांना जाते. भामरागडच्या या दाट अरण्यात अजून कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. काही रुग्ण कोरोनाबाधित निघाले होते; पण ते गृह अलगीकरणातून बरे झाले आहेत.

लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे !

‘लोकांना लसीकरणाविषयी अनेक अपसमज आहेत. मला सर्वजण ‘गावची लेक आणि बहीण’ म्हणतात. त्यामुळे हे शक्य झाले. यात लोकबिरादरी आणि आरोग्य विभागाचे सहकार्य मिळाले.’ – भाग्यश्री लेखामी, सरपंच, कोठी ग्रामपंचायत

स्थानिक भाषेत व्हिडिओ सिद्ध केले !

‘काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण वाढत होते. जनजागृतीसाठी येथील आदिवासी भाषेत व्हिडिओ सिद्ध केले. लोकांमधील अपसमज दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.’ – आधुनिक वैद्य दिगंत आमटे, लोकबिरादरी रुग्णालय.