कोरोना नियमावलीचा अवलंब करत ‘शिवसमर्थ प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा !

चाफळच्या श्रीराम मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती नेली शिंगणवाडीला

‘शिवसमर्थ प्रेरणा दिन’ साजरा करतांना शिवप्रेमी

सातारा, २५ मे (वार्ता.) – गत ७ वर्षांपासून चालू असलेली ‘शिवसमर्थ प्रेरणा दिना’ची परंपरा या वर्षीही अखंडित राहिली आहे. कोरोना नियमावलीचा अवलंब करत २४ मे या दिवशी चाफळ येथील श्रीराम मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती शिंगणवाडी येथे नेत मोठ्या उत्साहात ‘शिवसमर्थ प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. अनुमाने ४०० वर्षांपूर्वी वैशाख शुक्ल नवमी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची चाफळजवळ शिंगणवाडी येथे प्रथम भेट झाली. यातून प्रेरणा घेऊन शिवप्रेमींनी ‘शिवसमर्थ प्रेरणा दिन’ साजरा करण्याचे ठरवले. ७ वर्षे ही परंपरा चालू राहिली; मात्र कोरोनामुळे ही परंपरा खंडित होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली; मात्र शिवप्रेमींचा निर्धार आणि तळमळ यांमुळे ही परंपरा अखंडित राहिली.

२४ मे या दिवशी सकाळी चाफळ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घेऊन शिवप्रेमींनी शिंगणवाडीच्या दिशेने प्रस्थान केले. मूर्ती पायीच नेण्यात आली. या वेळी शिंगणवाडी ग्रामस्थांनी शिंगणवाडीच्या वेशीपर्यंत समर्थ रामदास स्वामी यांची मूर्ती आणली. दोन्ही मूर्तींची भेट होताच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘हर हर महादेव’, ‘जय जय रघुवीर समर्थ’ अशा घोषणांनी आसमंत दणाणून गेला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते स्थापन झालेल्या शिवसमर्थ स्मारकाला प्रदक्षिणा घालून पुढे दोन्ही मूर्ती खडीच्या मारुति मंदिरापर्यंत नेण्यात आल्या.