वैद्यकीय परीक्षा रहित होणार नाही, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे ! – अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री

(डावीकडे) अमित देशमुख

मुंबई – वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या लेखी, तसेच प्रात्यक्षिक परीक्षा रहित करणे किंवा ‘ऑनलाईन’ घेणे नियमाला अनुसरून नाही. न्यायालयानेही त्यास अनुमती दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी हे समजून घ्यावे. परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक विषयांच्या पदवी परीक्षा रहित अथवा ‘ऑनलाईन’ पद्धतीने घेण्यात आल्यामुळे वैद्यकीय परीक्षेविषयी अमित देशमुख यांनी भूमिका स्पष्ट केली.

याविषयी अमित देशमुख म्हणाले, ‘‘मागच्या वर्षी कोरोनाचे संकट असतांनाही महाराष्ट्र आरोग्य विद्यापिठाने परीक्षा यशस्वीरित्या घेतली. या परीक्षा सुरक्षित वातावरणात पार पडल्या. यावर्षी १० जूनपासून वैद्यकीय परीक्षा चालू होणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना संपूर्णत: कोविड सुरक्षाकवच पुरवले जाईल. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेतली जाईल. परीक्षेविषयी अधिष्ठाता आणि प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.’’