अन्य जिल्ह्यांतील कर्मचारी आणि अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल
सिंधुदुर्ग – तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण आस्थापनाकडून (महावितरणकडून) अतिरिक्त मनुष्यबळ (कर्मचारी) पाठवण्यात आल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांनी दिली.
चक्रीवादळामुळे जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या वीजपुरवठा यंत्रणेची वाताहत झाली. यामध्ये ३१ उपकेंद्रे, तसेच १०० हून अधिक वीजवाहिन्या तुटल्याने जिल्ह्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या सिंधुदुर्ग मंडळ कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी स्थानिक ठेकेदारांसह काम करण्यास प्रारंभ केला आहे; परंतु झालेल्या हानीचा विचार करून जिल्ह्यात बारामती, सातारा आणि कोल्हापूर येथील २१ ठेकेदार संस्थांचे २५० प्रशिक्षित कामगार, याशिवाय कल्याण, कोल्हापूर, भांडुप, बारामती, सांगली येथील नियमित ४६८ जनमित्र आणि ८७ अभियंत्यांचे पथक १९ मे या दिवशी जिल्ह्यात आले असून स्थानिक २३४ जनमित्रांसह वीजपुरवठा पूर्ववत् करण्याचे काम हाती घेतले आहे.
केवळ कोरोनाविषयक दक्षता घेण्यासाठी स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे स्थानिक पातळीवर कोणताही त्रास होणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बंद पडलेल्या ३१ उपकेंद्रांपैकी सर्वच्या सर्व ३१ उपकेंद्रे पुन्हा चालू झाली असून ७८ वीजवाहिन्याही चालू करण्यात यश आले आहे. सध्या मोठ्या प्रमाणात २५ कोविड केअर सेंटरचा वीजपुरवठा प्राधान्याने चालू करण्यात आला आहे. आता पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा अग्रक्रमाने चालू करण्यात येणार आहे. वीजयंत्रणा उभारणीच्या कामाला वेग आल्याने बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा चालू झाला असल्याचे पाटील यांनी सांगितले.