पणजी, २० मे (वार्ता.) – तौक्ते चक्रीवादळानंतर राज्यातील ९८ टक्के वीजपुरवठा सुरळीत झाल्याचा दावा वीज खात्याने केला आहे. वीज खात्याच्या मते अजूनही हणजुणे, कान्सा-थिवी, आगशी, काणकोण, केपे आणि सांगे येथील काही भागांत वीजपुरवठा पूर्ववत् झालेला नाही. या भागांत २० मेच्या रात्रीपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचा दावा वीज खात्याने केला आहे. प्राप्त माहितीनुसार वेरे, नेरूल, रेईस-मागोस आणि पिळर्ण भागांतील लोकांची वीजपुरवठ्याची समस्या अजूनही सुटलेली नाही.
गोव्यात अनेक भाग अजूनही अंधारातच आहे. वीजपुरवठा पूर्ववत् करण्यासाठी राज्यशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची मागणी रुडॉल्फ फर्नांडिस यांनी केली आहे, तसेच म्हापसा शहर चक्रीवादळानंतर १०० घंटे अंधारात राहिल्याने ‘आप’ने आपत्कालीन गैरव्यवस्थापनावरून गोवा शासनावर टीका केली आहे.