वैशाख शुक्ल पक्ष अष्टमी (२० मे) या दिवशी रामनाथी आश्रमातील संत पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने…
सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेल्या सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) यांनी ११.५.२०२१ या रात्री १.३८ वाजता देहत्याग केला. आज त्यांच्या देहत्यागानंतरचा दहावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. पू. माईणकरआजींना जेवण भरवतांना त्यांनी २ घास खाल्यावर ‘नको’ म्हणणे आणि त्या ध्यानावस्थेत गेल्याचे जाणवणे
‘२८.८.२०२० या दिवशी मी पू. माईणकरआजींना भरवत होते. त्या वेळी पू. माईणकरआजींनी पोळीचे दोनच घास खाल्ले आणि त्या ‘जेवण झाकून ठेव. मला जेवायचे नाही’, असे मला म्हणाल्या. त्या वेळी मला ‘काय करायचे ?’, ते लक्षात आले नाही. मी पू. आजींकडे बघत राहिले. त्या वेळी ‘त्या ध्यानावस्थेत गेल्या आहेत’, असे मला जाणवले; म्हणून मी त्यांना बळजोरी न करता जेवण परत घेऊन आले.
२. पू. माईणकरआजी न जेवल्याने साधिकेचे मन निराश होऊन तिने परात्पर गुरुदेवांना आळवणे
नंतर मी स्वतःला जेवण वाढून घेत असतांना ‘पू. आजी काहीच जेवल्या नाहीत. ‘त्यांना माझ्या हातचे आवडत नाही’, असे वाटते. त्यांनी नेहमीच असे केले, तर त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होईल’, असे अनेक विचार येऊन मी निराश झाले. तेव्हा मी मनातून परात्पर गुरुदेवांना आळवले. मी त्यांना म्हणाले, ‘गुरुदेवा, तुम्हीच मला ‘काय करायचे ?’, ते सुचवा.’
३. भाव असलेल्या साधकांनी प्रार्थना करण्यास सुचवणे
मी जेवण वाढून घेतले. पटलावर माझ्या बाजूला एक भाव असलेले साधक बसले होते. मी त्यांना माझ्या मनातील विचार सांगितले. तेव्हा त्यांनी मला दृष्टीकोन दिला, ‘संत नेहमीच देवाच्या अनुसंधानात असतात. ते देवाने सांगितलेले लगेच ऐकतात. तू पू. आजींना जेवण घेऊन गेल्यावर श्रीरामाला सांग, ‘श्रीरामा, पू. आजी तुझ्या अनुसंधानात आहेत. मी त्यांना जेवण घेऊन आले आहे. आता तूच त्यांना जेवायला सांग आणि तूच त्यांना तुझ्या हातांनी भरव. मी केवळ माध्यम आहे.’
४. साधकाने सांगितलेली प्रार्थना केल्यावर आजींनी सगळे पदार्थ संपवणे
दुसर्या दिवशी मी त्या साधकाने सांगितलेली प्रार्थना केली आणि पू. आजींना जेवण भरवायला आरंभ केला. पू. आजींनी ४ – ५ घास खाल्ले आणि मला म्हणाल्या, ‘‘मला नको.’’ नंतर त्या ध्यानावस्थेत असल्यासारख्या बसल्या. मी पुन्हा तीच प्रार्थना केली. तेव्हा पू. आजींनी सर्व पदार्थ संपवले.
५. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. कर्तेपणा न घेता देवाला विचारल्यावर तो साधकाच्या माध्यमातून आपल्याला साहाय्य करतो.
आ. आपल्या मनातील विचार इतरांना सांगितल्यावर आपल्याला त्यांच्याकडून योग्य दृष्टीकोन मिळून आपल्या साधनेतील अडथळा दूर होतो आणि संतांप्रमाणे आपणही देवाचे ऐकले पाहिजे.’
– कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |