केजरीवाल देहलीचे मुख्यमंत्री असल्याने त्यांचे मत देशाचे मत नाही ! – भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे सिंगापूरकडे स्पष्टीकरण

केजरीवाल यांनी सिंगापूरमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकार आढळल्याविषयी केलेल्या वक्तव्याचे प्रकरण !

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी देहली – अरविंद केजरीवाल हे देहलीचे मुख्यमंत्री असल्याने त्यांचे मत हे देशाचे मत नाही, असे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी सिंगापूरला स्पष्ट केले.

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाच्या नव्या प्रकाराविषयी (स्ट्रेनविषयी) केलेल्या ट्वीटमध्ये ‘सिंगापूरमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवीन ‘स्ट्रेन’ लहान मुलांसाठी अत्यंत घातक आहे’, असे ट्वीट केले होते. त्यांचा हा दावा सिंगापूरचा आरोग्य विभाग आणि सिंगापूर दूतावास यांनी फेटाळला. त्यानंतर परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी भारताची अधिकृत भूमिका ट्वीट करून स्पष्ट केली.
डॉ. जयशंकर यांनी या ट्वीटमध्ये म्हटले, ‘कोरोनाच्या विरोधातील लढ्यामध्ये सिंगापूर आणि भारत यांच्यात अतिशय चांगले संबंध आहेत. सिंगापूरकडून केल्या जाणार्‍या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी आणि इतर साहाय्यासाठी आम्ही त्याचे आभारी आहोत. भारताच्या साहाय्यासाठी सैनिकी विमान पाठवण्याच्या त्याच्या कृतीतून हेच संबंध अधोरेखित होतात. तथापि ज्यांना पुरेशी माहिती असायला हवी होती, त्यांनी केलेली दायित्वशून्य वक्तव्ये दीर्घकाळ चालत आलेले (सिंगापूरसोबतचे) द्विपक्षीय संबंध बिघडवू शकतात. त्यामुळे मी हे स्पष्ट करतो की, अरविंद केजरीवाल हे देहलीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे मत हे देशाचे मत नाही.’