वादळीवार्यासह पावसाची शक्यता
लोकहो, अशा संकटांपासून कोणतीही सरकारी यंत्रणा नाही, तर ‘देवच वाचवील’, या श्रद्धेने साधना कराल, तरच सर्वच संकटांतूनही वाचाल !
मुंबई – तोक्ते चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागांत विशेषत: किनारपट्ट्यांवरील भागांत जोरदार फटका बसला. किनारपट्टी भागातील ११ जणांचा वादळामुळे मृत्यू झाला, तर ९ जण घायाळ झाले, अशी माहिती राज्याच्या आपत्ती नियंत्रण विभागाकडून देण्यात आली. वादळामुळे राज्यातील किनारपट्टी भागांतील अनेक घरांचे पत्रे वार्यामुळे उडून गेले. अनेक ठिकाणी घरे आणि गाड्या यांवर झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अनुमानानुसार राज्यातील चक्रीवादळाचे संकट अद्यापही संपलेले नाही. येत्या काही घंट्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळीवार्यासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून किनारपट्टीच्या भागात सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यातील १५ सहस्र नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील विद्युत्पुरवठा चक्रीवादळामुळे खंडित झाला. रत्नागिरी आणि रायगड येथील ४ जनावरे वादळामुळे मृत्यूमुखी पडली.
राज्यातील सहस्रावधी बांधकामांची पडझड !
चक्रीवादळामुळे राज्यातील सहस्रावधी घरांची अंशत: हानी झाली. यामध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक १ सहस्र ७८३ घरांची हानी झाली. यासह ठाणे २४, पालघर ४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, तर सातारा येथील ६ घरांची पडझड झाली. राज्यात एकूण ६ घरांची पूर्णत: पडझड झाली.
जहाजात अडकलेल्या १३७ प्रवाशांना सुरक्षित हालवले !
पालघर जिल्ह्यातील वडराई येथील समुद्रात रायगडच्या बाजूने जाणारे एक जहाज खडकात अडकले होते. यामधील १३७ प्रवाशांना दमण कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने वाचवण्यात यश आले.
‘मुंबई हाय’जवळ ओ.एन्.जी.सी. कर्मचार्यांच्या निवासस्थानाची जागा बुडाली; ९६ जण बेपत्ता !
वादळामुळे ‘मुंबई हाय’जवळ हिरा इंधन विहीर परिसरात ओ.एन्.जी.सी.च्या निवासी कर्मचार्यांच्या निवासाची जागा समुद्रात बुडाली आहे. ३१ जणांना बाहेर काढले असून ९६ कर्मचार्यांचा शोध घेण्यात येत आहे.
कोविड रुग्णालयांतील वीजपुरवठा कायम ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीकिनार्यावरील जिल्ह्यांमध्ये हानी आणि पडझड झाली असली, तरी कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही. त्यासाठी पर्यायी व्यवस्था सक्षमपणे चालू आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून, तसेच गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक चालू राहील, याची काळजी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. |