माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सूट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जिल्हाधिकार्‍यांना संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – एखादा जिल्हा जिंकतो, तेव्हाच देश जिंकतो. आपल्या देशात जेवढे जिल्हे आहेत, तेथे विविध आव्हानेही आहेत. आपल्या जिल्ह्यातील आव्हाने तुम्हाला चांगलीच समजली आहेत. तुमच्या जिल्ह्याने कोरोनावर मात केली, तर तो देशाचा विजय असेल. त्यामुळे मी जिल्हाधिकार्‍यांना सांगतो की, माझ्याकडून तुम्हाला पूर्ण सूट आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या ४६ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत दिला. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच लसीची प्रक्रिया वाढवण्याविषयी चर्चा केली. मोदी यांनी जिल्हाधिकार्‍यांना ‘फील्ड कमांडर’ म्हणून संबोधले. या बैठकीत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जर जिल्ह्यांमध्ये कोरोना नियंत्रणात आला, तर देशात आपोआप कोरोना नियंत्रणात येणार आहे. तुमच्याकडे संपूर्ण देशासाठी उपयुक्त ठरू शकणार्‍या काही सूचना असल्यास मला न डगमगता सांगा. कोविड व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ची काळजी घ्यावी लागेल. आपल्याला संसर्गही रोखायचा आहे आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही विनाव्यत्यय ठेवायचा आहे.