स्वार्थीपणाचा कहर !

महाराष्ट्रातील बारामती येथील औद्योगिक वसाहतीमधील पाटस रस्त्यावरून डिझेल घेऊन जाणारा टँकर नाल्यात कोसळल्याने टँकरमधील सर्व डिझेल नाल्यात पडले. या अपघातात टँकर चालक आणि क्लिनर दोघेही घायाळ झाले. त्यांना त्वरित औषधोपचाराची आवश्यकता होती; परंतु त्यांना त्वरित रुग्णालयात भरती करण्याऐवजी स्थानिक लोकांनी स्वतःच्या घरातील भांड्यांमधून डिझेल नेले ! या घटनेतील गावकर्‍यांमधील स्वार्थीपणा थक्क करायला लावणारा आहे.

स्थानिक लोक स्वतःच्या घरातील भांड्यांमधून डिझेल नेतांना

खरे पहाता अशा प्रकारे चोरी झाल्याची भारतातील ही काही पहिली घटना नाही. आजपर्यंत अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की, जेथे समाज व्यक्तीपेक्षा वस्तूंच्या चोरींकडे अधिक आकर्षित होतो. फळे, खाद्यपदार्थ, जीवनोपयोगी वस्तू घेऊन जाणार्‍या वाहनांचा अपघात झाल्यास स्थानिक लोक ‘मनाच्या नाही तर जनाच्या लाजेचा’ही विचार न करता सरळसरळ वस्तू पळवून नेतात. एवढेच काय पण कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या बोटांचा ठसा आणि भ्रमणभाष यांचा वापर करून रुग्णालयातील धर्मांध कर्मचार्‍यांनी ‘पे फोन अ‍ॅप’द्वारे रक्कम पळवली. व्यक्ती मृत झाल्यानंतरही ‘टाळूवरील लोणी खाण्यास’ कुणाचे मन कचरत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. भारतामध्ये घडणार्‍या या घटना म्हणजे स्वार्थीपणाच्या हिमनगाचे टोक आहे.

एकेकाळी महासत्ता असणार्‍या सुसंस्कृत भारतामध्ये आणि स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाल्यानंतर अशी प्रजा भारतामध्ये निर्माण होणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे; कारण जो समाज स्वार्थी असतो, तो देशाच्या प्रगतीचा विचार कधीच करू शकत नाही. शासनकर्त्यांनी समाजाला धर्मशिक्षण दिले असते, तर लोकांमध्ये योग्य आणि अयोग्य वागण्याची जाण निर्माण झाली असती. धर्मच व्यक्तीला योग्य काय ? आणि तसे का वागायचे ? याचे ज्ञान अन् बळ देतो. भारतातील निधर्मी शासनव्यवस्थेमुळे समाज स्वार्थी बनत आहे, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. शासनकर्त्यांप्रमाणेच जनताही या स्थितीला तेवढीच उत्तरदायी आहे. अजूनही हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्यास यापेक्षा वाईट स्थिती निर्माण होईल यात शंका नाही. त्यामुळे शासनकर्ते आणि जनता यांनी ‘धर्मशिक्षण घेतल्यासच स्वार्थीपणाचा कहर थांबेल’, हा बोध घ्यावा, ही अपेक्षा आहे.

– श्री. सचिन कौलकर, मिरज