शिर्डी येथील काँग्रेसचे सचिन चौगुले आणि साईबाबा वेल्फेअर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्यावर गुन्हा नोंद !

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण

श्री साईबाबा सुपर रुग्णालय

शिर्डी (जिल्हा नगर) – कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी येथील काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले आणि साईबाबा वेल्फेअर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

९ आणि १० मे या कालावधीत साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा सुपर रुग्णालयातील कोविड निषिद्ध क्षेत्रात विनाअनुमती, ‘पीपीई किट’ परिधान न करता आणि कोणतीही दक्षता न घेता सचिन चौगुले आणि अरुण जाधव यांनी रुग्णालयात प्रवेश केला, तसेच कोविड रुग्णांना भेटून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.

याविषयी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले म्हणाले, ‘‘माझ्या नातेवाइकांनी श्‍वास घ्यायला त्रास होत असल्याचा दूरभाष मला केला. त्यामुळे तातडीने मी रुग्णालयात गेलो. तेथील अवस्था आणि व्यवस्था अंगाला घाम फोडणारी होती. त्यामुळे मी सामाजिक माध्यमांतून हा प्रकार चव्हाट्यावर आणला. या गलथान कारभारामुळे विचलित होऊन आणि राग मनात धरून त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा नोंद केला. कोविड काळात इतर विविध पक्षांचे स्थानिक नेतेमंडळींनी रुग्णालयाला भेटी दिलेल्या आहेत. त्यांचे ‘सीसीटीव्ही’चे चित्रण पडताळून त्यांच्यावर कारवाई होणार का? सर्वच रुग्णांचे नातेवाईक ‘पीपीई किट’विना तेथे रहातात. त्यांच्यावरही पोलीस प्रशासन गुन्हे नोंद करणार का ?’’, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.