वडाळा बहिरोबा (नगर) येथे विनापरवाना कोविड सेंटर चालू केल्याप्रकरणी मराठी मिशन संस्थेस नोटीस

वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकला

( प्रतिकात्मक चित्र )

वडाळा बहिरोबा (नगर) – विनापरवाना कोविड सेंटर चालू करून कोरोना रुग्णांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक केल्याप्रकरणी मराठी मिशन संस्थेच्या वडाळा मिशन येथील एफ्.जे.एफ्.एम्. रुग्णालयाच्या चालकांना नोटीस देण्यात आली आहे. या रुग्णालयाने कोविड रुग्णांवरील उपचारानंतरच्या वैद्यकीय कचर्‍याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावता सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला. नोटिसीमध्ये याचाही उल्लेख आहे.

या कोविड रुग्णालयासमोर स्वतंत्र औषधालय चालू करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोविड रुग्णांसाठी लिहून दिलेली औषधे रुग्णांचे नातेवाईक याच औषधालयातून खरेदी करत होते. नगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून रेमडेसिविरचा काळाबाजार करणारी टोळी पकडल्यानंतर या औषधालयाच्या चालकाने संशयास्पदरित्या रात्रीतून पलायन केले.