एका शहरात झालेल्या एका संगीत संमेलनात संगीत कलाकारांविषयी जाणवलेली सूत्रे

संगीत आणि वाद्ये यांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘२०.२.२०२० या दिवशी आम्ही महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे काही साधक अभ्यास करण्याच्या दृष्टीने एका शहरातील एका संगीत संमेलनाला गेलो होतो. तेथे आम्हाला ३ कलाकारांचे गायन आणि त्यांना साथ देणार्‍या २ कलाकारांचे वादन ऐकायला मिळाले. त्या वेळी मला समाजातील कलाकारांमध्ये स्वभावदोष आणि अहं तीव्र स्वरूपात असल्याचे जाणवले, तसेच समवेत ‘संगीत किंवा कुठलीही कला ही ईश्वरप्राप्तीसाठी आहे’, याची पुसटशी जाणीवही समाजाला नाही’, हेही तीव्रतेने जाणवले. या कार्यक्रमाच्या वेळी गायक आणि वादक यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी

१. गायन

या संगीत संमेलनात तीन गायिकांनी गायन सादर केले.

१ अ. पहिल्या गायिका

१ अ १. गायिकेने गातांना केलेले हातवारे आणि तिच्या तोंडवळ्यावरील अहंकारयुक्त हावभाव यांमुळे त्यांचे गायन अंतर्मनापर्यंत न पोचणे : प्रथम एका महिला गायिकेचे गायन चालू झाले. त्यांचे गायन काही प्रमाणात कर्णमधुर होते, तरी त्या वेळी मला प्रयत्नपूर्वक नामजप करावा लागत होता. त्यांचे गायन चालू असतांना त्यांचे हातवारे आणि तोंडवळ्यावरील हावभाव यांतून ‘मी किती छान गात आहे !’, असा आविर्भाव आणि अहंकार व्यक्त होत होता. त्यांच्या तोंडवळ्यावरील हावभावांमुळे मला त्यांचा तोंडवळा त्रासिक वाटत होता. त्यामुळे त्यांचे गाणे माझ्या मनापर्यंत पोचत नव्हते. गाणे अंतर्मनात जाऊन देवाशी अनुसंधान साधणे तर फारच लांब राहिले. तेव्हा ‘त्या केवळ ‘स्वतःची वाहवा व्हावी’, यासाठी शब्दगायन करत आहेत’, असे मला प्रकर्षाने जाणवले.

१ आ. दुसर्‍या गायिका

१ आ १. दुसर्‍या गायिकेच्या वर्तनातून ‘तीव्र अहंकार, चटकन राग येणे आणि नम्रता नसणे’ इत्यादी स्वभावदोष जाणवणे : त्यानंतर दुसर्‍या गायिकेचे गायन होते. निवेदकाने त्यांचे आडनाव चुकीचे उच्चारले, तेव्हा त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी तो व्यक्तही केला. निवेदकाशी बोलतांना त्यांच्या बोलण्यात कुठेही नम्रता नव्हती.

१ आ २. अहंकारयुक्त गायनामुळे ते गायन ऐकतांना मनाला आनंद न मिळणे : गायन करतांनाही त्यांचे अनावश्यक हातवारे होत होते. तेव्हा गायनापेक्षा त्यांच्या हातवार्‍यांकडेच अधिक लक्ष जात होते. त्यातून त्यांचा ‘मी श्रेष्ठ आहे’, असा अहंकार व्यक्त होत होता. त्यांचे गायन मोठ्याने ओरडून गायल्यासारखे वाटत होते. त्यात माधुर्यही नव्हते. त्या गायनाचा मनाला आनंद अनुभवता आला नाही, मग आध्यात्मिक अनुभव येणे तर लांबच राहिले. ‘संगीत कलेतून स्वतः ईश्वराची अनुभूती घ्यावी आणि श्रोत्यांनाही ईश्वराची अनुभूती यावी’, या दृष्टीने गायन व्हावे’, असा विचारच गायन सादर करणार्‍या या कलाकारांमध्ये नाही’, असे मला तीव्रतेने जाणवले.

१ इ. तिसर्‍या गायिका

१ इ १. अन्य वयस्कर कलाकाराचा अनादर होईल, असे बोलणे : तिसर्‍या गायिकेच्या गायनापूर्वी काही मिनिटे अगोदर एका वयस्कर रंगकर्मी कलाकाराचे दोन मिनिटांचेच भाषण होते. तेव्हा त्या गायिका सर्व श्रोत्यांसमोरच वयस्कर कलाकारांना म्हणाल्या, ‘‘माझा गाण्याचा वेळ न्यून होईल.’’ तेव्हा एक कलाकार म्हणून त्यांचे हे बोलणे अतिशय अयोग्य वाटले. यातून ‘एका कलाकाराला दुसर्‍या कलाकाराविषयी आदर नसणे’, ही गोष्ट खेदजनक जाणवली.

१ इ २. दुराग्रही भूमिका असणे : त्या गायिका एवढेच बोलून थांबल्या नाहीत, तर पुढे म्हणाल्या, ‘‘माझा वेळ संपला, तरी मी दोन बंदिशी तुम्हाला ऐकवणारच आहे. ज्यांना जेवायला जायचे आहे, त्यांनी जावे. त्यांना माझा विरोध नाही.’’ त्यांचे हे बोलणेही पुष्कळच अयोग्य असल्याचे मला जाणवले. यात ‘स्वतःचे गायन इतरांना ऐकवायचेच आहे’, असा त्यांचा हट्ट अन् आग्रह होता.

१ इ ३. ‘शिष्यांवर आपल्या वागण्याचा काय परिणाम होईल ?’, असा विचार न करता शिष्यांसमोर अयोग्य वर्तन करणे : त्या गायिका आपल्या शिष्यांसह तेथे आल्या होत्या, म्हणजे त्या गुरुपदावर असलेल्या गायिका होत्या. ‘कलाक्षेत्रातील गुरुपदावरील एका व्यक्तीने अन्य वयस्कर कलाकाराचा आदर न करणे आणि ‘माझी गाण्याची वेळ संपली, तरी मी गाणारच’, असे जाहीररित्या अन् तेही ‘स्वतःच्या शिष्यांसमोर बोलणे’, ही गोष्ट मनाला अतिशय वेदनादायक वाटली. यातून ‘ते शिष्य काय शिकतील ? त्यांच्या मनावर किती अयोग्य संस्कार होतील ?’, असा कुठलाही विचार त्यांच्या मनाला शिवला नव्हता. या सर्व प्रसंगांमधून मला विशेषकरून या कलाकारांमधील ‘नम्रतेचा अभाव’ आणि अहंकार तीव्रतेने जाणवला.

१ इ ४. गायिकेने पुष्कळ सौंदर्यवर्धन (मेक-अप) केले असल्याने त्यांच्याकडे पहातांना चांगले न वाटणे, त्यांचे गायन चालू असतांना ‘त्यांना अतिशय त्रास होत आहे’, असे वाटणे, गायन ऐकतांना डोके दुखू लागणे आणि नामजप बंद पडणे : त्या गायिका गात असतांना त्यांचा आवाज थोडा बिघडला होता. त्यांनी पुष्कळ सौंदर्यवर्धन (मेक-अप) केले होते. त्यांच्याकडे पहातांना मला चांगले वाटत नव्हते. त्यांचे गायन चालू असतांनाही त्यांच्या तोंडवळ्यावरील हावभाव पहातांना ‘त्यांना अतिशय त्रास होत आहे’, असे मला वाटत होते. तेव्हा ‘त्या गात आहेत’, असा विचारही माझ्या मनात आला नाही. त्यांचे गायन ऐकतांना माझे डोके दुखू लागले आणि मन अस्वस्थ झाले. मी प्रयत्नपूर्वक नामजप करत होते, तोही त्यांचे गायन ऐकतांना बंद पडला. त्यांचे गायन संपल्यानंतरही बराच वेळ माझे डोके दुखत होते.

१ ई. कार्यक्रमानंतर ग्लानी येऊन झोपावे लागणे : या कार्यक्रमानंतर मला पुष्कळ ग्लानी आली आणि त्रास होऊन काही वेळ झोपावे लागले. तेव्हा संगीतातून ‘मन प्रसन्न होणे किंवा देवाच्या अस्तित्वाचा अनुभव घेणे’ यांपेक्षा मला त्यांचा गायनाचा त्रासच अधिक प्रमाणात झाला.

२. तबला आणि संवादिनी (पेटी) वादन

२ अ. वादन ऐकतांना ‘वादकांचे मन वादनाशी एकरूप झाले आहे’, असे जाणवणे आणि त्यांच्या देहाभोवती अर्धा फूट अंतरापर्यंत एक पुसटसे वलय दिसणे : या कार्यक्रमात या गायिकांच्या साथीला एक तबलावादक आणि एक संवादिनीवादक होते. त्यांचे वादन ऐकतांना ‘त्यांचे मन वादनाशी एकरूप झाले आहे’, असे मला जाणवले. त्या दोघांच्या देहांतून एक तरंग वरच्या दिशेने जातांना दिसला. वादनाच्या वेळी तबला वादकाच्या देहाभोवती अर्धा फूट अंतरापर्यंत एक पुसटसे पांढरे वलय दिसले, तर संवादिनी वादकाच्या भोवती अर्धा फूट अंतरापर्यंत फिकट निळसर रंगाचे वलय दिसले.

२ आ. त्यांच्या वादनातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा गायनातून निर्माण होणार्‍या नकारात्मक ऊर्जेला भेदण्याचा प्रयत्न करत होती.

२ इ. गायन थांबून केवळ वादन होत होते, तेव्हा देवाने मनाला काही प्रमाणात आनंद अनुभवायला दिला. यासाठी माझ्याकडून देवाचरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘संतांनी ‘संगीतातून भगवंत कसा अनुभवावा ?’, हे शिकवल्याने आणि वेळोवेळी त्याविषयी मार्गदर्शन केल्यानेच या कार्यक्रमात गायनाचा अभ्यास विविध दृष्टींनी करता आला’,  यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.२.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक