रामनाथी (गोवा), १२ मे (वार्ता.) – नम्रता, निरपेक्ष प्रीती यांसारखे दैवी गुण असलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्य भाव असलेल्या, तसेच सध्या सनातनच्या रामनाथी आश्रमात वास्तव्यास असलेल्या सनातनच्या ८६ व्या संत पू. शालिनी माईणकर (वय ९२ वर्षे) यांनी ११ मे ला रात्री १.३८ वाजता देहत्याग केला. त्या मूळच्या वास्को (गोवा) येथील होत्या. त्यांच्या पार्थिवावर १२ मे या दिवशी भावपूर्ण वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. पू. माईणकरआजी यांच्या पश्चात ३ कन्या, जावई, नातवंडे आणि पतवंडे, असा परिवार आहे. त्यांची नात ६६ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. सोनल जोशी या सनातनच्या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करतात, तर कन्या सौ. अनुराधा पुरोहित, सौ. मेधा जोशी आणि सौ. सुधा जोशी याही साधना करत आहेत.
मुळातच सात्त्विक वृत्ती आणि अहं अल्प असलेल्या पू. माईणकरआजींनी संसारातील प्रत्येक खडतर प्रसंगांना सहनशीलतेने तोंड दिले. प्रत्येक प्रसंग त्यांनी ‘ईश्वरेच्छा’ म्हणून स्वीकारला आणि ‘अध्यात्म प्रत्यक्ष कृतीत कसे आणायचे ?’, याची शिकवण सर्वांना दिली. ‘संसारी असून देहे चित्त राहो चरणांसी’, अशी स्थिती असलेल्या आजींची अंतर्मनातून साधना होत राहिली. नम्रता, निरपेक्ष प्रीती आणि अनासक्त वृत्ती यांमुळे ‘संसारात राहूनही जलद आध्यात्मिक उन्नती करून घेता येते’, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. येत्या १५ मे या दिवशी त्यांना रामनाथी आश्रमात येऊन २ वर्षे होतील. या काळातही त्यांनी येथील साधकांवर प्रीतीचा वर्षाव केला. त्यांच्या सगुण सेवेतून साधकांना चैतन्य मिळून आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ झाला.