सांगली – कोरोनाच्या काळात रुग्णांना दिलासा मिळावा, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान आणि ‘सांगली कोविड केअर रिसोर्सेस फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात १०० खाटांचे कोरोना केंद्र उभारण्यात आले. सांगली-मिरज मार्गावरील श्री राधास्वामी सत्संग व्यासच्या जागेमध्ये हे केंद्र चालू करण्यात आले आहे.
कोरोनाबाधित असलेले आणि सौम्य लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांसाठी हे केंद्र आहे. रुग्णांना भरती करून घेतांना औषधे आणि पांघरूण, दंतमंजन, पिण्याचे पाणी यांसह आवश्यक साहित्य देण्यात येणार आहे. या केंद्रामध्ये ७ आधुनिक वैद्य कार्यरत असून रुग्णांना २ वेळा आयुर्वेदिक काढा, चहा, अल्पाहार, भोजन यांची विनामूल्य सोय आहे. प्रतिदिन प्राणायाम, समुपदेशन करण्यात येणार असून यासाठी १५ स्वयंसेवक या केंद्रावर कार्यरत असणार आहेत.
या वेळी संघचालक विलास चौथाई, जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी, महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती पांडुरंग कोरे, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे डॉ. राम लाडे, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ आदी उपस्थित होते.