८ मेच्या दिवशी चीनचे नियंत्रण गमावलेले रॉकेट पृथ्वीवरील नागरी भागांत कोसळण्याची शक्यता ! – अमेरिका

वॉशिंग्टन/बीजिंग – चीनने अवकाशात पाठवलेले रॉकेट नियंत्रण न राहिल्याने ८ मे या दिवशी पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. जवळपास २१ टन वजनाचे हे रॉकेट घनदाट लोकसंख्या असलेल्या शहरांवर कोसळू शकते. यामध्ये अमेरिकेचे न्यूयॉर्क, स्पेनचे माद्रिद, चीनची राजधानी बीजिंग यांचा समावेश आहे.  अंतराळात चीनकडून अंतराळ स्थानक केंद्र उभारले जात आहे. नियोजनानुसार हे रॉकेट समुद्रात कोसळणार होते; मात्र त्याआधीच नियंत्रण गमावल्याने ते पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

१. अमेरिकी संरक्षण खात्याचे प्रवक्ते माईक हावर्ड यांनी सांगितले की, १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद असलेला रॉकेट ४ मैल प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीकडे येत आहे. अमेरिकेचे स्पेस कमांड यावर लक्ष ठेवून आहे.

२. खगोल शास्त्रज्ञ जोनाथन मॅकडोवल यांनी सांगितले की, न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंग आदी ठिकाणी हे रॉकेट कुठेही कोसळू शकते; मात्र पृथ्वीच्या जवळ आल्यानंतर या रॉकेटचा बराचसा भाग जळून नष्ट होईल.