घरगडी कि पोलीस ?

भारतातील पोलिसांना ‘कर्तव्यचुकार’, ‘हिंदुद्रोही’, ‘भ्रष्ट’ आदी विविध विशेषणे लावली जातात. त्यांच्याविषयी सहानुभूती वाटण्याचे प्रसंग तसे थोडेच. विविध समस्यांनी आणि दुर्गुणांनी ग्रस्त असणार्‍या पोलीसदलाच्या काही समस्याही आहेत. त्याविषयी अधूनमधून बोलले जाते. छत्तीसगडमधील धमतारी येथील एका पोलिसाने सांगितलेल्या व्यथेमुळे त्यांच्या समस्या पुन्हा समोर आल्या. तेथील पोलीस उज्ज्वल दिवाण यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडून माळीकाम, घरकाम करून घेत असल्याने आणि त्याविषयी आवाज उठवल्यावर त्यांना शिवीगाळ करत असल्याचे कारण सांगत पदाचे त्यागपत्र दिले. या प्रकरणात किती तथ्य आहे, हे पुढे येईल का? हाही प्रश्न आहे; कारण विभागाच्या अंतर्गत या प्रकरणाची चौकशी झाल्यास ती पारदर्शकपणे होईल का? याविषयी शंका उपस्थित होऊ शकते. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी ‘दिवाण यांचे स्थानांतर करण्यात आले होते. त्या ठिकाणी ते गेलेच नाहीत. हे वर्तन त्यांना शोभत नाही’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. थोडक्यात मनाच्या विरोधात स्थानांतर झाल्यामुळे दिवाण अशी टीका करत आहेत, असे अधीक्षकांचे म्हणणे आहे. असे प्रकार घडणे, हे काही नवीन नाही. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडून ‘ड्युटी’च्या नावाखाली कनिष्ठ पोलीस कर्मचार्‍यांची पिळवणूक होण्याविषयी नेहमीच बोलले जाते. कनिष्ठ कर्मचार्‍यांना बाजारात पाठवणे, मुलांची शाळेतून ने-आण करणे, अन्य वैयक्तिक कामे करून घेणे असले प्रकार सर्रास घडतात. फार क्वचित् एखादा तत्त्वनिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय स्वतःची घरगुती कामे स्वतः करतांना दिसतात; मात्र अन्यत्र हेच चित्र आहे. पोलिसांच्या समस्यांविषयी उदा. त्यांना रहाण्यास सदनिका न मिळणे, औषधोपचार, मानसिक आरोग्य किंवा घंटोन्घंटे बजावण्यात येणारी सेवा यांविषयी नेहमीच बोलले किंवा लिहिले जाते. याविषयी पोलिसांना न्याय्यहक्क मिळण्यासाठी प्रयत्नही केला जातो; मात्र कनिष्ठ पोलीस कर्मचार्‍यांच्या अशा प्रकारे होणार्‍या पिळवणुकीविषयी कुणीही बोलत नाही. जे ध्येय समोर ठेवून एखादा तरुण पोलीसदलात भरती होतो, ते ध्येय वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या दावणीला बांधून पूर्ण होते का ? अन्य वेळी ‘पोलीसदलात पोलिसांच्या जागा रिक्त असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास अडचण येते’, असे पोलीसदलाकडून सांगण्यात येते. हे योग्यही आहे; मात्र वरिष्ठ अधिकार्‍यांकडे जे पोलीस अशा प्रकारे घरकाम करत आहेत, त्यांचा पूर्णकालीन वापर करण्याच्या पर्यायाचा कधी विचार होतो का ? अशांकडून पूर्णकालीन पोलिसी सेवा करून घेतल्यास त्याचा पोलीसदलाच्या फलनिष्पत्तीवर नक्कीच परिणाम होईल. लोकांची सेवा करण्यासाठी ज्यांना सरकारने नियुक्त केले आहे, त्यांना स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी वापरणे, हा जनताद्रोह आहे. यातून स्वार्थी मनोवृत्ती दिसून येते. ‘जे आपले नाही, ज्यांच्यावर आपला अधिकार नाही’, अशांना स्वतःच्या वैयक्तिक कामांसाठी राबवून घेणे ही तत्त्वहीनता आणि स्वार्थी मनोवृत्ती झाली. याचे भान जर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना राहिले नसेल, तर शासनकर्त्यांनी त्यांना त्याची जाणीव करून देणे आवश्यक; मात्र आताच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांची मनोवृत्तीही जनताभिमुख कुठे आहे ? त्यामुळे ते पोलिसांना काय सल्ला देणार ? थोडक्यात व्यवस्थाच तत्त्वनिष्ठ आणि जनताभिमुख नसल्याने असे प्रश्न निर्माण होत आहेत. हे थांबवण्यासाठी या सदोष व्यवस्थेत पालट अपेक्षित आहेत !