कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

आयसीयू खाटेसाठी रुग्णांकडून पैसे घेणार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याचे पिंपरी-चिंचवडच्या महापौर यांचे आयुक्तांना आदेश !

खासगी डॉक्टर आणि कोविड सेंटर चालवणार्‍या स्पर्श हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाइकांकडून १ लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार

बेडसाठी पैसे घेणार्‍यांवर गुन्हा नोंद करून त्यांना त्वरित शिक्षा करावी, तसेच अतिरिक्त पैसेही वसूल करावेत, जेणेकरून पुन्हा असे करण्याचे धाडस कुणी करणार नाही !

पिंपरी-चिंचवड, ३ मे – ऑटो क्लस्टर हॉस्पिटल ही कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. या सेंटरचा व्यय महापालिका करते. बेडसाठी पैसे घेणार्‍यांवर आणि कोविड सेंटरच्या ठेकेदारांवरही गुन्हा नोंद करून कोविडचे व्यवस्थापन त्या संस्थेकडून काढून घ्यावे, असे आदेश महापौर माई ढोरे यांनी पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहेत.

महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या नातेवाइकांना ‘१ लाख रुपये द्या, खाट मिळवून देतो’, असे खासगी डॉक्टरांनी सांगत १ लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे ऑटो क्लस्टरमध्ये चालवण्यात येत असलेल्या कोविड सेंटरमध्ये उघडकीस आला आहे. हे कोविड सेंटर महापालिकेद्वारे विनामूल्य सेवा देत असून याचे संचलन स्पर्श रुग्णालयाच्या वतीने केले जाते. संबंधित रुग्णांवर उपचार करीत असतांना मुख्याध्यापिकेचे २८ एप्रिल या दिवशी निधन झाले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. हा प्रकार चिखलीतील भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड आणि विकास डोळस यांना समजला. त्यांनी त्वरित कोविड सेंटरशी संपर्क केल्यावर स्पर्श हॉस्पिटलने आपले हात झटकले. त्यानंतर संबंधित खासगी डॉक्टरला चोप दिल्यानंतर त्याने कोविड सेंटर चालवणार्‍या स्पर्श हॉस्पिटलचे सल्लागार यांनी ८० सहस्र रुपये आणि स्वतः २० सहस्र रुपये घेतल्याचे मान्य केले.


दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस !

सकाळी मृत घोषित केलेल्या रुग्णाला कुटुंबीय न्यायला आले असता तो जिवंत असून त्याच्यावर उपचार चालू असल्याचे उघड !

एका रुग्णाला तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णाच्या कुटुंबियांना ३० एप्रिलला सकाळी रुग्णालयात उपचार घेत असलेला त्यांचा रुग्ण दगावल्याचा संदेश आला. रुग्णाच्या अंत्यविधीसंबंधी सर्व सिद्धता झाल्यानंतर रुग्णाचा मुलगा रुग्णालयाच्या शवागारात रुग्णाचा मृतदेह कह्यात घेण्यासाठी गेला. मुलाला शवागारातील कर्मचार्‍याने दाखवलेला मृतदेह त्याच्या वडिलांचा नाही, असे लक्षात आल्याने त्वरित सरकारी नोकर असलेल्या त्याच्या काकांना संपर्क साधला. काकांनी रुग्णालयाच्या शवागारात धाव घेतली. शवागार व्यवस्थापनाला प्रारंभी ‘मृतदेहांची अदलाबदल झाली असावी’, असे वाटले; परंतु नंतर शवागाराचे प्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर यांनी त्यांच्या विभागातील एका व्यक्तीला रुग्णालयाच्या संबंधित वॉर्डमध्ये रुग्ण तपासणी करण्यासाठी पाठवले असता संबंधित रुग्ण जिवंत आहे आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असल्याचे आढळले.

डॉ. मधू घोडकिरेकर यांनी या सर्व प्रकरणाचा अहवाल सिद्ध केला असून हा अहवाल जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाला पाठवला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी कागदपत्रांचा घोळ झाला कि अन्य कुठे गोंधळ झाला, याविषयी अन्वेषण चालू आहे.


दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात रुग्णांची संख्या आवाक्याबाहेर !

मी रुग्णालयात भूमीवर झोपण्यास सिद्ध आहे; पण माझ्यावर उपचार करा ! – रुग्णाची दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाला विनवणी

मी रुग्णालयात भूमीवर किंवा एखाद्या कोपर्‍यात झोपण्यास सिद्ध आहे; पण मला भरती करून घ्या आणि माझ्यावर उपचार करा. मला होत असलेल्या वेदना सहन होत नाहीत, अशी विनवणी एका रुग्णाने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे केली. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, तसेच इ.एस्.आय. ही कोरोना रुग्णालये रुग्णांनी पूर्णपणे भरलेली आहेत. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात खाटांची कमतरता असल्याने अनेक रुग्णांवर भूमीवर झोपलेल्या स्थितीतच उपचार केले जात आहेत, तसेच रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचार्‍यांवरही कामाचा अतिरिक्त ताण असल्याने रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या प्रश्‍नांना कुणाकडूनच उत्तरे मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास सर्वांवरच उपचार करणे शक्य होणार नसल्याचे वैद्यकीय कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. प्राप्त माहितीनुसार दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला.


गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत !

‘गार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने ‘गोमेकॉ’च्या अधिष्ठात्यांना (डीनना) पत्र लिहून आरोग्य सुविधेची दयनीय स्थिती केली उघड !

पणजी, ३ मे (वार्ता.) – गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेन्शिअल डॉक्टर्स (‘गार्ड’) या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉच्या) अधिष्ठात्यांना पत्र लिहून महाविद्यालयातील आरोग्य सुविधेची दयनीय स्थिती उघड केली आहे. या पत्रातील महत्त्वाची सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.

१. रुग्णालयात ‘कोविड वॉर्ड’मधील ऑक्सिजनचा पुरवठा एवढा अल्प आहे की, यामुळे ‘एन्.आय.व्ही.’ अन् ‘व्हेंटिलेटर’ योग्य क्षमतेने कार्यरत ठेवता येत नाही. रुग्णांसाठी वापरण्यात येणारा ऑक्सिजन सिलिंडर मध्यरात्री संपतो आणि त्याजागी नवीन ऑक्सिजन सिलिंडर लावण्यासाठी २ ते ३ घंटे किंवा त्याहून अधिक अवधी जातो आणि या काळात रुग्णांना ऑक्सिजनविना रहावे लागते.

२. अत्यवस्थ रुग्णांना ट्रॉली अन् भूमीवर झोपवून ‘व्हेंटिलेटर’ पुरवण्यात आला आहे. ३० खाटांची क्षमता असलेल्या वॉर्डमध्ये सरासरी ५० रुग्ण उपचार घेत आहेत.

३. वरिष्ठ अधिकारी महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन किंवा खाटा यांची कमतरता नाही, अशी नियमितपणे विधाने करत असल्याचे प्रसारमाध्यमातून वाचण्यात येत आहे. यामुळे ‘कॅज्युल्टी’ विभाग अन् कोविड वॉर्ड यांमधील रुग्ण ‘महाविद्यालयात खाटांची कमतरता नसतांना आम्हाला ट्रॉली किंवा व्हीलचेअर किंवा भूमी यांवर का झोपवले आहे ?’, ‘रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा का केला जात नाही ?’, असे प्रश्‍न विचारत आहेत.

४. रात्री किंवा मध्यरात्री ऑक्सिजन संपल्याने रुग्णाची स्थिती अधिक खालावते किंवा रुग्ण दगावतो. यामुळे निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाइकांचा रोष सहन करावा लागत आहे. रुग्णांचे नातेवाईक साधनसुविधांच्या अभावाचा रोष निवासी डॉक्टरांवर काढत आहेत. निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे सांगितले गेले आहे, तरी डॉक्टरांना अजूनही पुरेशा प्रमाणात सुरक्षा वाढवलेली नाही.

५. कोरोनाचा कहर चालू असूनही महाविद्यालयात प्रामुख्याने ‘व्हीआयपी’ संस्कृती राबवली जात असल्याचे निदर्शनास येते. निवासी डॉक्टरांना या ‘व्हीआयपी’ रुग्णांना पहाण्यास सांगण्यात येते आणि या रुग्णांना जलदगतीने रुग्णालयात भरती करण्यास सांगण्यात येते. या ‘व्हीआयपी’ रुग्णांना प्रवेशाचे निर्बंध नसतात आणि यामुळे २ ते ३ घंटे प्रतिक्षेत असलेले आणि स्थिती अत्यवस्थ असलेले रुग्ण निवासी डॉक्टरांशी भांडण करतात. (हे ‘व्हीआयपी’ खासगी रुग्णालयांत का जात नाहीत ? – संपादक)

६. प्रतिदिन नवीन कोविड सुविधा उपलब्ध केल्याची योजना असल्याचे सांगितले जाते; मात्र अतिरिक्त कर्मचारी किंवा डॉक्टर नियुक्त केले जात नाहीत. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, ई.एस्.आय. रुग्णालय आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय यांव्यतिरिक्त नवीन कोविड सुविधाही निवासी डॉक्टरांनी पहायची का ? आज १ डॉक्टर सरासरी ३० रुग्णांना पहात आहे आणि यामधील काही डॉक्टर २४ घंटे सेवा बजावत आहेत.