बंगालमध्ये हिंदूंसाठी काळरात्र !

बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू ही ४ राज्ये आणि पुद्दुचेरी हा केंद्रशासित प्रदेश येथे पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल २ मे या दिवशी लागला. यातील बंगालमधील निवडणूक ही भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची अन् तृणमूल काँग्रेसच्या अस्तित्वाची झाली होती. भाजपमधील दिग्गज विरुद्ध ममता(बानो) अशी ही लढत होती. भाजपविरुद्ध तृणमूल काँग्रेस असा टोकाचा संघर्ष होता. या संघर्षात स्वत: नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारी यांच्याकडून ममता(बानो) पराभूत होऊनही तृणमूलने स्वत:चा गड राखला. त्यामुळे डाव्यांच्या ११ वर्षांपूर्वी केलेल्या पराभवानंतर सलग तीन वेळा तृणमूल काँग्रेसची सत्ता बंगालमध्ये राखण्यास ममता(बानो) यांना यश आले आहे. ममता(बानो) यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव होणे, हेसुद्धा छोटे यश नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

गत ४-५ मासांच्या बातम्या पाहिल्यास दोघांमधील संघर्ष किती रक्तरंजीत होता, याची कल्पना येते. प्रतिदिन भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांच्यावर प्राणघातक आक्रमणे, भाजपच्या समर्थकांची घरे अन् दुकाने यांची हानी करणे, भाजपच्या बाजूने बोलणार्‍या प्रसारमाध्यमांच्या गाड्या फोडणे असे अनेक विध्वंसक प्रकार तृणमूलकडून झाले. तृणमूलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भयावह आक्रमकता बंगाल येथील जनतेने अनुभवली, पाहिली, तरीही व्यक्तीनिष्ठेतेतच अडकलेल्या भारतियांना त्यांचा लोकप्रतिनिधी ठरवतांना याची आठवण होत नाही, हे दुर्दैव आहे. बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना झालेली गर्दी पहाता या वेळी भाजप तृणमूलला तुल्यबळ होऊ शकेल, अशी परिस्थिती दिसत होती, तरीही भाजपला ते साध्य करता आले नाही. तरी मागील निवडणुकांच्या ३ आमदारांच्या आकड्यांपेक्षा आताची स्थिती पुष्कळ चांगली आहे, हेही तितकेच खरे. काँग्रेस आणि साम्यवादी पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत उभे होते, तरी निश्‍चितपणे त्यांचा ममता(बानो) यांना छुपा पाठिंबा मिळाला असण्याचीही दाट शक्यता आहे. भाजपला हारवणे हे त्यांचे लक्ष्य त्यांनी ठेवलेले असू शकते. धर्मांधांची एकगठ्ठा मते ममतांच्या आवाहनानुसार त्यांना मिळाली आहेत; मात्र भाजपला सत्तेपासून दूर रोखण्यासाठी मोठ्या घडामोडी पडद्याआड झालेल्या असणारच, हे निश्‍चितपणे सांगता येते. काही झाले तरी आता बंगाल येथील हिंदूंची मोठी परीक्षा आहे. ज्या धर्मांधांच्या जिवावर ममता(बानो) यांनी डाव्यांना हरवले, भाजपविरुद्ध त्यांचाच वापर झाला आहे. आता ते धर्मांध उन्मत होणार यात शंकाच नाही. त्यामुळे केवळ भाजपच्या पदाधिकार्‍यांसाठीच नव्हे, तर तेथील हिंदूंसाठीही काळरात्र चालू झाली आहे, हे त्यांनी लक्षात घेऊन सतर्क आणि संघटित रहाणे आवश्यक आहे.

तमिळनाडूत सत्तांतर होऊन अण्णाद्रमुक ऐवजी द्रमुकने सत्ता मिळवली. तेथे नेहमीप्रमाणे प्रति ५ वर्षांनी सत्तापालट असतोच. त्याप्रमाणे आता झाले; मात्र आता हिंदुद्वेषी स्टॅलिन सत्तेवर आले असल्याने तेथेही हिंदूंची परीक्षा आहे. तमिळनाडूचा इतिहास पाहिला असता, भले कोणीही सत्तेवर येऊ दे, हिंदूंना तसा तिथे विशेष लाभ झालेला नाही. हिंदुद्वेषी स्टॅलिन आता कशी सत्ता राखतात, हे पहावे लागेल.

पुद्दुचेरीत सत्तांतर

केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. निवडणुकांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामे दिल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. निवडणुकांपूर्वी तेथे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बाजूने अनेक पक्षांच्या आघाड्या होत्या. येथे भाजपने कूटनीती वापरल्याने अथवा काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे विजय मिळाला असू शकतो.

केरळ पुन्हा डावा !

केरळमध्ये डावे अर्थात् साम्यवाद अजून संपायचे नाव घेत नाही. हिंदुद्वेषी आणि हिंदूंवर अत्याचार करण्यात डावे आघाडीवर आहेत. साम्यवाद्यांनी मागील काही वर्षांमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या केल्या आहेत. हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारे लव्ह जिहाद रोखण्यात अपशय आले आहे, नव्हे त्यांचा छुपा पाठिंबा आहे. आता तर ख्रिस्ती मुली बळी पडत आहेत. येथे हिंदूंची अक्षरशः नृशंस हत्याकांडे होत असूनही तेथे जनतेने साम्यवाद्यांना कौल दिला, याचेही आश्‍चर्य वाटले. जनतेला केरळ येथे अस्थिरता आणि हत्याकांडेच अपेक्षित आहेत का ? कारण देशात केरळ साक्षरतेमध्ये अग्रभागी आहे, तरीही साम्यवाद्यांच्या धाकदपटशा, दादागिरी यांपुढे जनतेचे काही चालत नाही, हेसुद्धा खरे आहे. आता येत्या काळात येथे हिंदूंना अजून काय काय भोगावे लागणार आहे, ते पहावे लागेल.

राष्ट्रहिताच्या निर्णयाचा विजय !

भाजपने आसाममध्ये घुसखोरांना हाकलण्यासाठी लोकसंख्या नोंदणी (एन्.आर्.सी) करण्याचा प्रयत्न केल्यावर धर्मांधांचे तळवे चाटणार्‍यांनी पुष्कळ आकांडतांडव केला. यामुळे स्थानिकांवर अन्याय होईल, मुसलमानांवर अन्याय होईल, अशी ओरड केली. तसेच भाजप शासनाच्या या प्रयत्नामुळे लोक नाराज होऊन पुन्हा भाजपला मत देणार नाहीत, असे सांगितले गेले; मात्र प्रत्यक्षात आजचे चित्र स्पष्ट आहे. स्थानिक आसामींना बांगलादेशी किंवा रोहिंग्या घुसखोर नकोच आहेत आणि त्यांना लोकसंख्या नोंदणी अपेक्षितच आहे, भाजपच्या प्रयत्नांना त्यांचा पाठिंबा आहे, हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. याउलट बंगालमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची मते तृणमूलला मिळाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजप घेत असलेल्या राष्ट्रहितैषी निर्णयांना जनतेचा पाठिंबा मिळतो आणि तो मतपेटीतही रूपांतरीत होतो, हे भाजपने लक्षात घेऊन असे निर्णय घेऊन त्याविषयी ठाम रहावे, हीच जनतेची अपेक्षा आहे.