सातारा पोलीस दलात नवीन ७२ वाहने 

सातारा, २८ एप्रिल (वार्ता.) – जिल्हा नियोजन निधीतून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला नवीन वाहन देण्यात आले आहे. यामध्ये २४ मोठी वाहने आणि ४८ मोटारसायकली अशा एकूण ७२ वाहनांचा समावेश आहे. ही वाहने पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सातारा पोलीस दलाकडे सोपवण्यात आली.

या वेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सातारा पोलीस दलातील अनेक वाहने जुनी झाली होती. त्यामुळे जिल्हा नियोजन निधीमधून नवीन १३ स्कॉर्पिओ, ५ बोलेरो, ६ व्हॅन आणि ४८ मोटारसायकली ही वाहने सातारा पोलीस दलाला देण्यात आली आहेत. या वाहनांमुळे जिल्ह्यातील पोलीस दलाची क्षमता वाढून निश्‍चितच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलिसांना मोठे साहाय्य मिळणार आहे. या वाहनांसाठी जिल्हा नियोजनमधून ३ कोटी ५० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. जिल्हातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याने पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांनी सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले.

https://www.facebook.com/Chh.UdayanrajeBhonsleOfficial/videos/158435572776870/