जिल्हा क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयामुळे रुग्णांना दिलासा ! – बाळासाहेब पाटील 

जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा कोविड रुग्णालयाचे उद्घाटन करतांना बाळासाहेब पाटील

सातारा, २८ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहामध्ये कोविड रुग्णालय चालू करण्यात येत आहे. या रुग्णालयात ७८ ऑक्सिजन बेड असून त्यामुळे रुग्णांना  दिलासा मिळणार आहे, असा विश्‍वास सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रीडा संकुलात नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदी मान्यवर उपस्थित होते.

बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, शासनाने कडक निर्बंध घातलेले असले, तरी  नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे. ज्या घरातील व्यक्ती बाधित आहेत, त्यांच्या घरातील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. तसेच मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखणे आदींचा उपयोग करून कोरोना विरुद्धची लढाई आपण सर्वांनी जिंकुयात.