सांसारिक कर्तव्य आणि गुरुसेवा यांची योग्य सांगड घालणार्‍या शिवडी (मुंबई) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. वनमाला वैती (वय ६८ वर्षे)  !

सौ. वनमाला वैती

शिवडी (मुंबई) येथील सनातनच्या साधिका सौ. वनमाला वैती यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. १४ सप्टेंबर या दिवशी ‘ऑनलाईन सत्संगा’द्वारे सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ही आनंदवार्ता साधकांना दिली. साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

१. कौटुंबिक दायित्व निभावणे

‘सौ. वनमाला वैतीकाकू यांच्या घरी रुग्णाइत सासूबाई होत्या. ‘सासूबाईंना वेळेत जेवण देणे, त्यांना काही ‘हवे-नको’ ते पहाणे’, हे सर्व काकू वेळच्या वेळी करायच्या. काकूंनी अंथरूणाला खिळून असणार्‍या रुग्णाइत सासूबाईंची ९ वर्षे सेवा केली. वर्ष २०१६ मध्ये वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांच्या सासूबाईंचे निधन झाले. त्यानंतर काकू सेवेला अधिक वेळ देऊ लागल्या.

२. नियोजनकौशल्य

काकू प्रतिदिन घरातील स्वयंपाक, कपडे धुणे, भांडी घासणे, लादी पुसणे आदी सर्व कामे करून सकाळी ८.३० वाजता कार्यालयात जाण्यासाठी निघायच्या. त्यासाठी त्या प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठायच्या.

३. वक्तशीरपणा

‘काकूंनी कुठेही अनावश्यक वेळ व्यय केला आहे’, असे कधीही दिसत नाही. त्या नेहमी सत्संगासाठी वेळेत उपस्थित असतात. घरी वयस्कर सासूबाई असल्याने त्यांना वेळेत घरी जावे लागायचे. त्यामुळे त्यांची वेळ झाल्यावर त्या सत्संगातून निघायच्या.

४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

४ अ. सवलत न घेणे : त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतरही कुठलीही सवलत न घेता त्या पहाटे ४ वाजता उठून नामजप करतात.

४ आ. प्रतिदिन आढावा देणे : कोरोनाच्या दळणवळण बंदीच्या कालावधीत त्यांची व्यष्टी साधनेची तळमळ वाढली आहे. त्यांना आढाव्यासाठी भ्रमणभाष केल्यावर त्यांना घरच्या अडचणीमुळे बोलणे शक्य नसेल, त्या वेळी त्या ‘मी नंतर भ्रमणभाष करू का ?’, असे प्रेमाने विचारतात. घरात अडचणी असूनही त्या कधीच आढावा देणे टाळत नाहीत.

४ इ . शिकण्याची वृत्ती

१. आरंभी ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न कसे करायचे ?’, हे त्यांच्या लक्षात यायचे नाही. ‘चुका आणि स्वभावदोष कसे शोधायचे ? ‘स्वभावदोष आणि अहंचे पैलू’ यांची व्याप्ती कशी काढायची ?’, हे त्यांच्या लक्षात यायचे नाही; मात्र आढावा झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्या सहसाधकांकडून त्यांना न समजलेली सूत्रे समजून घ्यायच्या आणि त्यानुसार व्यष्टी साधनेचे प्रयत्न करायच्या.

२. काकूंचा व्यष्टी साधनेचा आढावा प्रतिदिन रात्री १० ते १२ या वेळेत असतो. काकूंना सकाळी लवकर उठावे लागते; म्हणून त्यांना ‘शक्य तेवढाच वेळ थांबा’, असे सांगितले होते; परंतु हळूहळू काकू आढावा पूर्ण होईपर्यंत थांबत असल्याचे लक्षात आले.

५. सेवेची तळमळ

अ. आधी घरच्या अडचणींमुळे काकूंना सेवेसाठी वेळ देतांना मर्यादा यायची; परंतु त्याविषयी कुठलेही गार्‍हाणे न करता त्या नियमितपणे थोडा वेळ सेवेसाठी द्यायच्या. सायंकाळी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांचे २ घंटे विज्ञापनांशी संबंधित सेवा करण्याचे नियोजन असायचे. त्याप्रमाणे त्या तळमळीने खंड पडू न देता सेवा करायच्या.

आ. काकूंच्या सासूबाईंची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना सासूबाईंची सेवा करतांना सेवेसाठी वेळ देणे अशक्य झाले. तेव्हा वर्ष २००६ मध्ये काकूंनी निवृत्तीला ६ वर्षे शेष असतांनाच स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्या घरातील आवरून सकाळी २ घंटे आणि सायंकाळी २ घंटे सेवेसाठी देत आहेत.

इ. काकूंचे पती श्री. नरेंद्र वैती यांचीही प्रकृती बरी नसते; परंतु अशाही परिस्थितीत काकू अखंड सेवारत असतात.

ई. विज्ञापने घेण्यासाठी कितीही दूर जावे लागले, तरी त्या तिथे जाऊन विज्ञापने घेतात.

उ. कोरोनामुळे दळणवळण बंदीच्या कालावधीत काकूंकडून सेवेची तळमळ आणि गुणवत्ता वाढवण्यासाठीचे प्रयत्न वाढले. त्या प्रतिदिन ध्येय ठेवून २० वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न करतात आणि सेवेचा आढावाही वेळेत देतात.

ऊ. काही वेळा सहसाधिका उपलब्ध नसल्यास काकूंना विज्ञापने घेण्यासाठी एकटीलाच जावे लागते. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर समवेत आहेत’, असा भाव ठेवून त्या एकट्याच जाऊन विज्ञापने मिळवण्याची सेवा करतात.

–  सौ. कल्पना कार्येकर आणि सौ. सुहासिनी परब (मुंबई) (१९.८.२०२०)


कर्तव्यतत्पर आणि  सेवेची तीव्र तळमळ असणार्‍या सौ. वनमाला वैती !

(पू.) सौ. संगीता जाधव

१. वक्तशीरपणा

‘सौ. वनमाला वैतीकाकूंचे वय ६८ वर्षे असूनही त्या घरचे दायित्व आणि सेवा यांची चांगली सांगड घालतात. त्या सत्संगाला नियमित आणि वेळेत उपस्थित असतात. घरी इतक्या अडचणी असूनही ‘त्यांना सत्संगाला यायला उशीर झाला’, असे कधीच झाले नाही.

२. कर्तव्यतत्पर

सौ. वैतीकाकू घरातील दायित्वाविषयीही पुष्कळ सतर्क आहेत. ‘त्यांनी कुटुंबातील कुठलीही गोष्ट करायची कधी टाळली आहे’, असे कधीच झाले नाही. त्या सेवेविषयी जितक्या सतर्क असतात, तितक्याच त्या घरातील कर्तव्याप्रतीही सतर्क असतात. त्या घरातील दायित्व आणि सेवा यांतील सर्व गोष्टी वेळच्या वेळी पूर्ण करतात. त्यांची कर्तव्यतत्परता, त्यासाठीची सतर्कता आणि सेवेची तळमळ अतिशय कौतुकास्पद आहे.

३. सेवेची तळमळ

३ अ. भ्रमणभाषवरून संपर्क करून विज्ञापने मिळवणे अवघड वाटत असतांनाही नियमित मिळणारी सर्व विज्ञापने समयमर्यादेत मिळवणे : त्यांना भ्रमणभाषवरून संपर्क करण्याची सवय नाही. आजपर्यंत त्यांनी प्रत्यक्ष भेटूनच विज्ञापनदाते आणि वाचक यांना संपर्क केले आहेत. दळणवळण बंदीच्या काळात भ्रमणभाषवरून संपर्क करणे काकूंना थोडे कठीण वाटत होते; तरीही काकूंनी भ्रमणभाषवरून संपर्क करून त्यांना नियमित मिळणारी सर्वच विज्ञापने समयमर्यादेत मिळवली. काकूंचे वय ६८ वर्षे असूनही त्यांनी या वयात भ्रमणभाषवरून संपर्क करून मोठ्या संख्येने विज्ञापने मिळवली.

३ आ. विज्ञापनदाते आणि वाचकांशी नियमित अन् चांगला संपर्क ठेवणे : काकूंनी वाचक आणि विज्ञापनदाते यांना चांगल्या प्रकारे जोडून ठेवले आहे. त्या विज्ञापनदात्यांच्या नियमित संपर्कात रहातात. त्या विज्ञापनदात्यांकडून केवळ ‘विज्ञापने घेणे’ एवढेच न करता त्या त्यांना सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांविषयी माहिती सांगतात. काकू विज्ञापनदात्यांकडून सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांची मागणी घेऊन ती वेळच्या वेळी पूर्णही करतात.

३ इ. प्रायोजक मिळवणे : त्यांना ‘एखाद्या गोष्टीसाठी प्रायोजक हवे आहेत’, असे सांगितल्यास काकू त्यासाठी नेहमी तत्पर असतात. त्या लगेचच विज्ञापनदात्यांना संपर्क करून प्रायोजक मिळवण्याचा प्रयत्न करतात.

४. कृतज्ञता

साधक परिस्थितीनुसार वर्तमानातकाळात राहून सेवा करतात. काळ कसाही असला; तरी परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे साधकांकडून सेवा घडत आहे. ‘परात्पर गुरुमाऊलींनी असे साधक सिद्ध केले आहेत’, यासाठी पुष्कळ कृतज्ञता वाटते. तेच साधकांकडून सेवा करवून घेतात. यासाठी गुरुमाऊलींप्रती कृतज्ञता वाटते.

धन्य ते भगवान विष्णुस्वरूप श्री गुरु ! आणि धन्य ते तळमळ अन् भाव असणारे साधक !’

– (पू.) सौ. संगीता जाधव, मुंबई (१९.८.२०२०)