अमरावती – कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी संचारबंदीच्या काळात अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत; मात्र अमरावती येथे शहरातील नागरिकांची गर्दी अल्प होत नसून रुग्णही वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात चालू असलेल्या संचारबंदीच्या वेळेत पालट करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंतच चालू रहाणार आहेत. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हे नवीन आदेश १८ एप्रिलपासून लागू केले आहेत. ३० एप्रिलच्या रात्री १२ वाजेपर्यंत हे आदेश संपूर्ण जिल्ह्यात लागू रहाणार आहेत. या नव्या आदेशात उपाहारगृहे, बार आणि खाद्यगृह यांंना सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्याची सवलत दिली आहे. सर्व रुग्णालये, लसीकरण आणि उपचार केंद्रे, प्रयोगशाळा, पेट्रोलपंप, ए.टी.एम्., औषधालय, वैद्यकीय उपकरणे पुरवणारे उत्पादक, वितरक, विमा कार्यालये यांच्या सेवा त्यांच्या वेळेत सुरळीत चालू रहाणार आहेत.