लक्ष्मणपुरी येथील निवृत्त जिल्हा न्यायाधिशाच्या पत्नीचे कोरोनामुळे निधन

प्रशासनाने दिलेल्या क्रमांकावर संपर्क करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याचा परिणाम !

  • भाजपशासित राज्यात अशी घटना घडणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित नाही. अशा घटना घडू नयेत, यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !
  • एका निवृत्त न्यायाधिशाच्या कोरोनाबाधित पत्नीला उपचार मिळत नसतील, तर सामान्य नागरिकांचे काय होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथे एका निवृत्त न्यायाधिशाने त्यांच्या कोरोनाबाधित पत्नीला उपचार मिळण्यासाठी प्रशासनाला संपर्क केला. प्रशासनाने दिलेल्या क्रमांकावर संपर्क करूनही उपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याविषयी स्वतः निवृत्त न्यायाधिशांनी लिहिलेले पत्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

शहरातील गोमतीनगरामध्ये रहाणारे ६७ वर्षीय निवृत्त जिल्हा न्यायाधीश रमेश चंद्रा यांनी पत्रात लिहिले आहे, ‘मी १४ एप्रिलच्या सकाळी ७ वाजल्यापासून प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या क्रमांकावर संपर्क करत होतो; मात्र कुणीही औषध देण्यासाठी घरी आले नाही कि रुग्णालयात भरती करण्यासाठीची प्रक्रिया करण्यात आली. यामुळेच माझी पत्नी मधु चंद्रा यांचा मृत्यू झाला. सध्या अशी स्थिती आहे की, तिचा मृतदेह नेण्यासाठी कुणीही नाही. कृपया साहाय्य करा.’