शिरंगे (तालुका दोडामार्ग) येथे दगडाच्या खाणींतून अवैधरित्या मातीचे उत्खनन

मातीचे उत्खनन न थांबवल्यास उपोषणाला बसण्याची ग्रामस्थांची चेतावणी

काळ्या दगडाच्या खाणींचे उत्खनन

दोडामार्ग – तालुक्यातील तिलारी धरणाच्या नजीक काळ्या दगडाच्या खाणींचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. यातील काही खाणी या अवैधरित्या चालू आहेत. या खाणींचे उत्खनन हे तिलारी धरणापासून जवळच्या अंतरावर असून संबंधित ठेकेदार या खाणींतून काढण्यात येणारी माती रस्त्याजवळ टाकत आहेत. हा रस्ता शिरंगे पुनर्वसन गावातील काजू बागायतदारांच्या बागेत जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे. या ढिगार्‍यांमधील माती पावसाळ्यात वाहून या रस्त्यावर येते आणि रस्ता बंद होतो. त्यामुळे बागायतदारांना काजू बागायतींच्या कामांसाठी बागायतीत जाता येत नाही. या बागायतदारांनी या खाणींचे काम करणार्‍या ठेकेदारांना मातीचे ढिगारे काढण्यास सांगितले असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात. त्यामुळे बागायतदारांमध्ये तीव्र अप्रसन्नता निर्माण झाली आहे. अवैधरित्या चालू असलेल्या उत्खननाची शासनाने नोंद घ्यावी अन्यथा या खाणींच्या विरोधात उपोषणाला बसण्याची चेतावणी बागायतदार आणि ग्रामस्थ यांनी दिली आहे.