दळणवळण बंदीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षण सेवा’ करतांना सोलापूर येथील साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

१. श्री. मिनेश पुजारे

१ अ. ‘ऑनलाईन’ स्वरक्षण वर्ग घेण्यासाठी उपकरणे सहज उपलब्ध होणे आणि शौर्यजागृती शिबिराची सेवा करतांना श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे : दळणवळण बंदी झाल्यानंतर ‘२ आठवडे नेमके काय प्रयत्न करायला हवेत ?’, हे माझ्या लक्षात येत नव्हते. त्यानंतर ‘ऑनलाईन’ वर्ग चालू झाले. हे वर्ग घेण्यासाठी आवश्यक ती उपकरणे केंद्रात सहज उपलब्ध झाली. नंतर युवा साधकांसाठी शौर्यजागृती शिबिर चालू करायचे होते. ही सेवा करतांना मला प्रत्येक क्षणी श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवत होते. यापूर्वी असे नियोजन आणि सेवा कुणी केली नव्हती; पण सर्व साधक सकारात्मक होते आणि सर्वांनी ‘परात्पर गुरु डॉक्टर सर्व करवून घेणार आहेत. आपण केवळ प्रयत्न करण्यासाठी धडपड करायची’, असा भाव ठेवला होता.

१ आ. संघभावाने प्रयत्न केल्याने भगवंताची शक्ती कार्यरत होऊन ती दिशादर्शन करत असल्याचे अनुभवणे : दळणवळण बंदीच्या कालावधीत सर्व प्रशिक्षकांशी नियमित संपर्क राहिल्याने संघभाव वाढला. प्रशिक्षकांच्या सत्संगात ‘आध्यात्मिक स्तरावर करायचे प्रयत्न आणि शिकायला मिळालेली सूत्रे’ हे सांगण्याचे नियोजन केल्याने भगवंत सर्वांच्या माध्यमातून एकेक सूत्र सांगत होता. त्यामुळे अडचणी दूर होऊन सेवा परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत होते. ‘या वेळी संघभावाने प्रयत्न केल्यामुळे भगवंताची शक्ती कार्यरत होऊन आम्हाला दिशा देत आहे’, असे अनुभवता आले.

१ इ. आलेल्या अनुभूती

१ इ १. ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती वर्ग घेतांना ‘परात्पर गुरु डॉक्टर आसंदीवर बसले असून प्रत्येक प्रकार पहात आहेत’, असे अनुभवणे : प्रतिदिन ‘ऑनलाईन’ वर्ग घेतांना अडचणी यायच्या; पण परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक अडचणीवर मात करायला शिकवत होते. जिल्हा स्तरावर चालू झालेला हा पहिला मोठा शौर्यजागृती वर्ग होता. प्रतिदिन सकाळी वर्ग घेतांना मला एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळत होती. वर्ग घेतांना मी परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र एका आसंदीवर ठेवत असे. त्या वेळी ‘ते आसंदीवर प्रत्यक्ष बसले आहेत आणि मी करत असलेला प्रत्येक प्रकार पहात आहेत’, असे मला ७ दिवस अनुभवता आले.

१ इ २. शक्तिस्तवन म्हणतांना देवीचे अस्तित्व अनुभवता येणे : वर्ग चालू करण्यापूर्वी शक्तिस्तवन म्हणतांना मला देवीचे अस्तित्व जाणवायचे. शौर्यजागृती वर्गाच्या समारोपाच्या सत्रात मनोगत व्यक्त करतांना अनेक युवा साधकांनी ‘आम्हाला देवीचे अस्तित्व अनुभवायला मिळाले’, असे सांगितले. ‘त्या वेळी वर्गात देवीचे सूक्ष्मातून अस्तित्व होते’, याची देवीनेच प्रचीती दिली’, हे लक्षात येऊन मला कृतज्ञता वाटली.

१ इ ३. वर्गात घेण्यासाठी ‘देवच एकेक प्रकार सुचवत आहे आणि प्रत्येक प्रकारातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे जाणवणे : मला प्रशिक्षकांचा सराव वर्ग घेण्याची संधी मिळाली. तेव्हा ‘देवानेच मी व्यापक व्हावे आणि माझी तळमळ वाढावी’, यासाठी ही संधी दिली आहे’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटली. वर्गात प्रत्येक वेळी नवीन प्रकार सिद्ध करून तो घ्यावा लागत होता. तेव्हा देवच एकेक प्रकार सुचवत होता. वर्ग घेतांना ‘प्रत्येक प्रकारातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला अनुभवायला आले. काही वेळा ‘श्रीकृष्णाची विविध रूपे माझ्याभोवती गोल करून उभी आहेत आणि या स्थितीत ‘श्रीकृष्ण मला अर्जुन कसे बनायचे ?’, हे सांगत आहे’, असे मला जाणवत होते.

१ इ ४. महिला शौर्यजागृती उपक्रमाची सेवा करणार्‍या महिला प्रशिक्षकांमध्ये देवीचे तत्त्व कार्यरत होऊन देवीच सर्व करवून घेत असल्याचे अनुभवणे : जिल्ह्यामध्ये महिला शौर्यजागृती उपक्रम चालू करण्याचे नियोजन करतांना ‘श्री भवानीदेवीचे तत्त्व कार्यरत झाले आहे’, असे मला जाणवत होते. ‘या उपक्रमाची सेवा करणार्‍या महिला प्रशिक्षकांमध्ये देवीचे तत्त्व कार्यरत झाले आहे. त्यांच्या माध्यमातून देवीच सर्व करवून घेत आहे’, असे मला अनुभवायला आले. महिला शौर्यजागृती व्याख्यानाचा दिवस जवळ येत असतांना देवीच्या कृपेचा ओघ वाढतच होता. यापूर्वी मला देवाचे एवढे अस्तित्व आणि चैतन्य अनुभवता आले नव्हते. त्यामुळे माझ्या कृतज्ञताभावात वृद्धी होऊन माझ्या डोळ्यांत भावाश्रू दाटून येत होते.

२. कु. कांचन माकणे, सोलापूर  

२ अ. सहसाधकांनी प्रोत्साहन देऊन शिकवल्याने शिकण्यातील आनंद घेता येणे आणि ‘देवाने स्वतःला घडवण्यासाठी सर्व परिस्थिती निर्माण केली’, असे वाटणे : ‘ऑनलाईन’ वर्गाची सेवा चालू झाली. तेव्हा ‘हा वर्ग घ्यायला मला जमणार नाही’, असे मला वाटत होते. एक दिवस साधिकेने मला वर्ग घेण्यास सांगितले. त्या वेळी मी पूर्णपणे गडबडलेल्या स्थितीत वर्ग घेतला. माझ्याकडून वर्ग घेतांना काही चुका झाल्या, तरी मिनेशदादा आणि शिवलीलाताई यांनी मला आणखी चांगला वर्ग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मी त्यानंतरचा वर्ग घेऊ शकले. ‘देवाने मला घडवण्यासाठी सर्व परिस्थिती निर्माण केली’, असे मला वाटत होते.

२ आ. श्री. सुमित सागवेकर यांनी घेतलेल्या प्रशिक्षण वर्गात ‘ईश्‍वरी अधिष्ठान कसे असायला हवे ?’, ते शिकता येऊन ‘वर्गात चैतन्य कार्यरत आहे’, हे अनुभवता येणे : एका प्रशिक्षण वर्गामध्ये मला ‘ऑनलाईन’ सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला विविध प्रकार शिकायला मिळाले. सुमितदादा (श्री. सुमित सागवेकर) वर्ग घेतांना मधूनमधून श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुदेव यांच्या संदर्भातील भावप्रयोग सांगायचे. त्यामुळे वर्ग चालू असतांना मला उत्साह वाटायचा, तसेच प्रकारांशी एकरूपता साधता यायची. यातून ‘समाजातील व्यक्तींचे वर्ग घेतांना ईश्‍वरी अधिष्ठान कसे असायला हवे ?’, ते आम्हाला शिकता आले. ‘या वर्गात अधिक प्रकार होऊनही मला कधीच थकल्यासारखे अथवा क्षमता संपली आहे’, असे झाले नाही. ‘वर्गात चैतन्य कार्यरत आहे’, असे मला अनुभवायला आले.

२ इ. श्री. मिनेश पुजारे यांनी प्रेमाने सेवेतील बारकावे समजावणे : ‘जिल्हा प्रशिक्षण वर्गामुळे आम्हा सर्व प्रशिक्षक साधकांची मने जुळली आहेत’, असे मला जाणवते. साधक कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणत नाहीत. आम्हाला घडण्यासाठी मिनेशदादाचे पुष्कळ साहाय्य झाले. दादा प्रत्येक वेळी आम्हाला तत्त्वनिष्ठतेने समजून घेऊन प्रेमाने सेवेतील बारकावे सांगतात. ‘दादांमधील या गुणांमुळे आम्ही ही सेवा करू शकत आहोत’, असे वाटते.

२ ई. अनुभूती – महिला शौर्यजागृती व्याख्यानाचे नियोजन करतांना ‘श्री भवानीदेवीचा भंडारा संपूर्ण जिल्ह्यात उधळायचा असून प्रत्येक महिलेतील शौर्य जागृत करायचे आहे’, असे वाटणे आणि व्याख्यानाच्या दिवशी ‘भवानीमाता सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित करत आहे’, असे जाणवणे : काही दिवसांपूर्वी ‘जिल्हा स्तरावर महिला शौर्यजागृती व्याख्यानाचे नियोजन करणे, संपर्क करणे, ‘ऑनलाईन’ सत्संग घेणे’ या सेवा करतांना ‘श्री भवानीदेवीचा भंडारा संपूर्ण जिल्ह्यात उधळायचा असून प्रत्येक महिलेतील शौर्य जागृत करायचे आहे’, असे मला वाटत होते. या सेवेतील सर्व साधक सेवेशी एकरूप झाल्याने सर्वांनाच श्री भवानीदेवीची कृपा अनुभवता आली. मला व्याख्यानाच्या दिवशी दिवसभर एखादा सण असल्याप्रमाणे वाटत होते. ‘या दिवशी भवानीमाता सर्वत्र चैतन्य प्रक्षेपित करत आहे आणि व्याख्यान्याच्या वेळी भवानीमाता उपस्थित आहे’, असे मला जाणवले.’

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक