राहुरी (नगर) येथील पत्रकार आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या

माहिती अधिकार वापरून केलेल्या पाठपुराव्यामुळे हत्या झाल्याचा संशय

ही स्थिती राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी आहे !

रोहिदास दातीर

राहुरी (नगर) – येथील एका साप्ताहिकाचे पत्रकार आणि माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची अपहरणानंतर हत्या करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी हस्तगत केले असून आरोपी राज्यातील एका सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे.

दातीर यांचे ६ एप्रिल या दिवशी दुपारी अपहरण करण्यात आले. रात्री उशिरा कॉलेज रोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. ते दुपारी १२ वाजता दुचाकीवरून घरी जात होते. सातपीर बाबा दर्ग्याजवळून जातांना चारचाकी वाहनातून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण करून गाडीत बसवले आणि घेऊन गेले. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांना दातीर यांची दुचाकी आणि चप्पल आढळली. त्यांचा भ्रमणभाष बंद स्थितीत होता. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंद करून त्यांना शोधण्यास प्रारंभ केला. सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अपहरणासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा शोध लागला. पोलिसांनी वाहन कह्यात घेतले; मात्र आरोपी सापडले नाहीत. नंतर आरोपी एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘दातीर यांनी एका प्रकरणात माहिती अधिकार वापरून केलेल्या पाठपुराव्यामुळे अडचणीत आल्याच्या कारणातून आरोपींनी हत्या केली असावी’, असा संशय व्यक्त होत आहे. त्यांच्या मृतदेहाला पाहिल्यावर यांना अमानुष मारहाण झाल्याचे दिसून आले. यापूर्वी अनेक वेळा दातीर यांच्यावर आक्रमण झाले होते.

राहुरी तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे ते संस्थापक अध्यक्ष होते. पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना त्यांनी वाचा फोडली. राहुरी शहरातील रुग्णालयांचे अतिक्रमण, अनधिकृत बांधकामे अशा अनेक विषयांचा त्यांनी पाठपुरावा केला होता. काही प्रकरणांचे खटले संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत. त्यांची पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आक्रमणकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.