‘ऑनलाईन’ सत्संग ऐकून साधनेला आरंभ करणार्‍या आणि कोरोनामुळे घरात उद्भवलेल्या कठीण परिस्थितीला धैर्याने सामोर्‍या जाणार्‍या नट्टपक्कम्, पाँडेचेरी येथील सौ. निर्मला !

सौ. निर्मला

१. बहिणीने साधना चालू करण्याविषयी अनेक वेळा सांगूनही त्याविषयी उत्सुक नसणे

‘सौ. निर्मला या चेन्नई येथील साधिका सौ. कल्पना बालाजी यांच्या भगिनी आहेत. त्या पाँडेचेरीजवळील नट्टपक्कम् या गावात रहातात. त्यांचे एकत्र कुटुंब आहे. सौ. निर्मला गुरुपौर्णिमेच्या विशेष आवृत्तीसाठी नियमितपणे विज्ञापन देतात. सौ. कल्पना बालाजी यांनी त्यांना साधना चालू करण्याविषयी यापूर्वी अनेक वेळा सांगूनही सौ. निर्मला त्याविषयी उत्सुक नव्हत्या.

सौ. सुगंधी जयकुमार

२. दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकल्यावर शांत वाटणे आणि पू. (सौ.) उमा रविचंद्रन् ‘फेसबूक’वर घेत असलेला तमिळ भाषेतील धर्मसत्संग पहातांना आनंद मिळू लागणे

कोरोना महामारीमुळे झालेल्या दळणवळण बंदीच्या काळात सौ. निर्मला यांनी प्रत्येक सप्ताहात ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकण्यास आरंभ केला. त्यामुळे त्यांना शांत वाटू लागलेे. नंतर त्यांनी पू. (सौ.) उमा रविचंद्रन् प्रतिदिन ‘फेसबूक’वर घेत असलेला तमिळ भाषेतील धर्मसत्संग पहायला आरंभ केला. सत्संग पहातांना पुष्कळ आनंद मिळत असल्यामुळे त्यांना सत्संगाची ओढ लागली. एखाद्या वेळी सत्संगाची ‘लिंक’ मिळायला उशीर झाला, तर त्या लगेचच विचारून घ्यायच्या. आता त्या नियमितपणे नामजप करत आहेत.

३. यजमान, दीर आणि नंतर सासूबाई यांना ‘कोरोना’ची लागण झाल्याने ते रुग्णालयात भरती होणे, २ दिवसांनी सासूबाईंचा मृत्यू होणे; पण मुलांना त्यांचा अंत्यविधीही करता न येणे अन् या सर्व परिस्थितीला सौ. निर्मला यांनी धैर्याने सामोरे जाणे

सौ. निर्मला यांचे यजमान आणि दीर यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. नंतर त्यांच्या सासूबाईंनाही ‘कोरोना’ झाल्यामुळे त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आले. २ दिवसांनी त्यांच्या सासूबाईंचे निधन झाले. त्यांची दोन्ही मुले, म्हणजे सौ. निर्मला यांचे यजमान आणि दीर रुग्णालयात असल्यामुळे त्यांना आईचा अंत्यविधी करता आला नाही. त्या वेळी सौ. निर्मला या सर्व परिस्थितीला धैर्याने सामोरे गेल्या. हे सर्व २ दिवसांत घडले, तरीही त्या स्थिर मनाने रविवारच्या सत्संगाला उपस्थित राहिल्या. त्यांनी सत्संगात सांगितले, ‘‘सत्संगाला नियमित उपस्थित राहिल्यामुळेच माझे मनोबल वाढले आणि या दुःखावर मी मात करू शकले. देवाच्या कृपेमुळेच मला या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य मिळाले.’’

– सौ. सुगंधी जयकुमार, चेन्नई, तमिळनाडू. (१.१०.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक