|
पणजी, २ एप्रिल (वार्ता.) – पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘आक्रमणकर्ता’ असा उल्लेख करण्यात आला; मात्र याला विरोध झाल्यानंतर पर्यटन खात्याने ही वादग्रस्त ट्वीट मागे घेऊन चुकीमुळे असा उल्लेख झाल्याचे सांगून दिलगिरी व्यक्त केली आहे. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी या घटनेचे अन्वेेषण करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेवरून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, ‘गोवा फॉरवर्ड’, काँग्रेस पक्ष आदींनी सरकारवर टीका केली आहे.
चित्रावर क्लिक करा –
पर्यटन खात्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर गोव्यातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती आहे. यामध्ये वर्ष १६१२ मध्ये बांधलेल्या आग्वाद किल्ल्याची माहिती देतांना म्हटले आहे की, डच आणि मराठा या आक्रमणकर्त्यांपासून रक्षण करण्यासाठी पोर्तुगिजांना आग्वाद किल्ला महत्त्वाचा ठरला. याला विरोध झाल्यानंतर पर्यटन खात्याने चुकीची दुरुस्ती करणारे नवीन ट्वीट प्रसारित करून यामध्ये ‘आक्रमणकर्ते’ हा उल्लेख केवळ डच यांना संबोधित केल्याचे म्हटले आहे, तसेच या चुकीविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. घटनेला अनुसरून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
चुकीचे अन्वेषण करणार ! – बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री
ही चूक निषेधार्ह आहे. याविषयी अन्वेषण करण्यात येणार आहे. ही चूक व्हायला नको होती.
पर्यटन खाते पोर्तुगीज सालाझारशाहीला प्रोत्साहन देत आहे ! – दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते
दायित्वशून्य भाजप शासनाने ‘आक्रमणकर्ते’ असे संबोधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठ्यांना अपकीर्त केले आहे. पर्यटन खाते पोर्तुगीज सालाझारशाहीला प्रोत्साहन देत आहे. भाजप शासन सुधारित इतिहास लिहीत आहे का ? दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.
भाजप शासन द्वेष का करत आहे ? – ‘गोवा फॉरवर्ड’
भाजप शासनाने यापूर्वी एका घटनेवरून म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर देवस्थानच्या पदाधिकार्यांच्या विरोधात ‘प्रथमदर्शनी अहवाल’ (एफ्.आय.आर्.) नोंदवला होता. यानंतर कळंगुट येथे शिवजयंती मिरवणुकीला अनुज्ञप्ती नाकारली होती आणि आता छत्रपती शिवाजी महाराज यांना अपकीर्त करण्यात आले आहे. भाजप शासन असा द्वेष का करत आहे ?
शासनाचा निषेध ! – गिरीश चोडणकर, काँग्रेस
शूरवीर मराठ्यांना अपकीर्त करणार्या शासनाचा निषेध. भारताचा खरा इतिहास लपवणारी भाजप. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गोव्यासंबंधीचे कार्य यांविषयी काँग्रेस पक्षाला अभिमान वाटतो.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात गोव्यात हल्लीच्या काळात घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना
१. हल्लीच रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आर.जी.) या संघटनेच्या माजोर्डा येथे झालेल्या प्रचारसभेत एका फादरने भाषण करतांना मराठ्यांनी गोव्यावर केलेल्या आक्रमणापासून सेंट फ्रान्सिस झेवियर याने गोव्याचे रक्षण केल्याचे वादग्रस्त विधान केले होते. यानंतर ‘आर.जी.’वर सर्वच स्तरांतून टीका झाल्यावर संबंधित फादरने खुलासा करणारे एक चलचित्र (व्हिडिओ) प्रसारित केले.
२. कळंगुट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास आणि १९ फेब्रुवारी म्हणजे दिनांकानुसार शिवजयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढण्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार असल्याचे कारण पुढे करून अनुमती नाकारण्यात आली.