प्रगल्भ आणि लहान वयातच संत होण्याचे ध्येय ठेवणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय ९ वर्षे) !

कु. प्रार्थना महेश पाठक

१. नम्र

‘प्रार्थना नम्रतेने बोलते. मी तिला कधीच मोठ्या आवाजात बोलतांना पाहिले नाही. – सौ. राजश्री खोल्लम, पुणे

२. ‘ती मन लावून शाळेचा अभ्यास करते. ती अभ्यासातही हुशार आहे.’ – कु. स्नेहल गुब्याड, पुणे

३. ‘प्रार्थना मनाने अत्यंत निर्मळ आहे.’ – सौ. ज्योती दाते, पुणे

४. ‘प्रार्थना घरी आल्यावर आमच्या घरातील वातावरण हलके होऊन सर्व जण आनंदी असतात. तिच्या वागण्या-बोलण्याने सर्वांचे मन प्रसन्न होते.’ – सौ. राधा सोनवणे, पुणे

५. समंजस

अ. प्रार्थना १ – २ वर्षांची असतांना मनीषाताई तिला साधकांच्या पाळणाघरात ठेवत असे. तिची त्याविषयी कोणतीच तक्रार नसे. पाळणाघराची वेळ संपल्यावर तिला न्यायला एखादी साधिका जायची आणि त्या तिला काही घंटे आपल्या घरी ठेवायच्या. मनीषाताई सेवेत असल्याने बर्‍याच वेळा असे करावे लागायचे. तेव्हा प्रार्थना सहजतेने साधिकांसह त्यांच्या घरी जात असे. तिने ‘मला आईनेच न्यायला यायला हवे’, असा हट्ट कधी केला नाही.’ – सौ. राजश्री खोल्लम

आ. ‘तिने कधी कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही. अन्य लहान मुलांप्रमाणे ती चंचल आणि हट्टी नाही. सौ. मनीषाताई आणि श्री. महेशदादा रंगपंचमीनिमित्त खडकवासला मोहिमेच्या सेवेत व्यस्त असतांना ‘तिच्या वाढदिवसाला आई-बाबांनी काहीतरी करावे’, असे तिला जराही वाटले नाही. ‘ती भावनांच्या पलीकडे भावाच्या स्तरावर गेली आहे’, असे जाणवते.

इ. ‘एकदा तिला राधा-कृष्णाचे चित्र काढून हवे होते; पण मला ते काढून देण्यास विलंब झाला. तिने ३ – ४ वेळा मला त्याविषयी विचारले; पण ‘त्यात प्रतिक्रिया किंवा अपेक्षा’, असे काहीच नव्हते. तिने मला समजून घेतले.’ – कु. स्नेहल गुब्याड

ई. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी प्रार्थना मनीषाताई आणि महेशदादा यांच्यासह सभेच्या ठिकाणी रहायला जाते. तेव्हा ती तेथील साधकांमध्ये सहजतेने मिसळते. तेथील निवासाचे जे नियोजन असते, ते ती स्वीकारते.’ – सौ. नेहा मेहता

उ. ‘एकदा हडपसर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा होती. प्रार्थनाची शाळा तिथून फार दूर होती; मात्र तिथून ये-जा करतांना ती थकली किंवा चिडली नाही.’ – कु. स्नेहल गुब्याड

६. संस्कारक्षम

‘एखादे मूल उच्च लोकातून जन्माला आले असले, तरी ‘त्याला व्यवहारज्ञान देणे, कुणाशी कसे बोलायचे ? वागायचे ?’, हे शिकवणे’ हे आई-वडिलांचे दायित्व असते. ‘सौ. मनीषाताई आणि महेशदादा यांनी तिच्यावर पुष्कळ चांगले संस्कार केले आहेत’, असे प्रार्थनाच्या वागण्यावरून प्रकर्षाने जाणवते. प्रार्थना इतरांच्या वस्तूंना हात लावणे किंवा एखादा हट्ट करणे, आरडाओरड करणे, असे कधीच करतांना पाहिले नाही.’ – सौ. राजश्री खोल्लम

७. सहजता

‘एकदा ती आमच्या घरी असतांना माझ्या मुलीसह बाहेर जाण्यासाठी आवरून सिद्ध झाली. नंतर काही कारणाने आमचे जाणे रहित झाले. तेव्हा तिने ती परिस्थिती सहजतेने स्वीकारली. तेव्हा ती नाराज झाल्याचे अथवा तिला वाईट वाटल्याचे तिच्या तोंडवळ्यावर दिसत नव्हते. तिने लगेच दुसर्‍या परिस्थितीत स्वतःला गुंतवून घेतले.’ – सौ. राधा सोनवणे

८. शिकण्याची वृत्ती

‘ती सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना कसे प्रयत्न करू ?’, असे विचारते आणि त्यानुसार प्रयत्न करते.’ – सौ. नेहा मेहता

९. विचारून करणे

एकदा तिच्या वाढदिवसानिमित्त तिला ‘मेकअप किट’ द्यायचे होते. ‘ते घेऊ का’, हे तिने आईला विचारले आणि आईने होकार दिल्यावरच ती ‘हो’ म्हणाली. ती काही करायच्या आधी आईला विचारते. – सौ. राधा सोनवणे

१०. प्रेमभाव

अ. ‘ती प्रत्येक साधकाशी प्रेमाने वागते आणि बोलते. तिला बर्‍याच दिवसांनी भेटलेल्या साधकांशी ती ओळख ठेवून आपुलकीने बोलते.’ – सौ. नेहा मेहता आणि सौ. राजश्री खोल्लम

आ. एकदा तिने सेवाकेंद्रात सर्वांसाठी ‘सँडविच’ बनवले होते.’ – कु. स्नेहल गुब्याड

११. कठीण परिस्थितीत आनंदाने रहाणे 

अ. ‘वर्ष २०१७ मध्ये प्रार्थनाच्या आईला बरे नसल्याने ती रुग्णालयात होती. तेव्हा काही दिवस प्रार्थना आमच्या घरी रहायला होती. तेव्हा ती ६ वर्षांची होती. आई जवळ नाही; म्हणून तिची आठवण काढून प्रार्थना कधीच रडली नाही. ‘तिला एखादी गोष्ट हवी, एखादी गोष्ट आवडत नाही’, असे तिचे कधीच नसते.’ – सौ. ज्योती दाते

आ. ‘वर्ष २०१८ मध्ये एकदा मनीषाताईला रुग्णालयात भरती केले होते. त्या वेळी महेशदादांना (सौ. मनीषाताईंचे यजमान) ताईसह थांबावे लागले होते. तेव्हा प्रार्थना काही दिवस आमच्या घरी रहायला होती. महेशदादाही ३ दिवस तिला भेटले नव्हते, तरी तिने कुठलाही त्रास दिला नाही.’ – सौ. राधा सोनवणे

१२. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

अ. ‘एका सत्संगात सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी सांगितले, ‘‘दिवसभर एक कार्यक्रम असल्याने आम्हाला सेवाकेंद्रात यायला उशीर झाला, तरी प्रार्थना जागी होती. ती बगलामुखी स्तोत्र ऐकून मगच झोपली.’’ – सौ. नेहा मेहता

आ. ‘तिने व्यष्टी साधनेची घडी बसावी; म्हणून आईने सांगितल्यानुसार तपाससूची बनवली आहे.’ – कु. स्नेहल गुब्याड

इ. ‘तिने लहान वयातच संत होण्याचे ध्येय ठेवले आहे. ‘ती सदैव श्रीकृष्णाच्या विचारांमध्ये रममाण असते’, असे जाणवते. तिचे साधनेचे दृष्टीकोन बालवयातही स्पष्ट आहेत. तिच्यात पुष्कळ प्रगल्भता आहे.’ – सौ. ज्योती दाते

१३. सेवा करणे

‘ती आश्रमातील आवरणे, स्वच्छता किंवा अन्य सेवा यांत आनंदाने आणि उत्साहाने सहभागी होते. ‘मी लहान आहे, तर का करू ?’, असे तिला कधीच वाटत नाही.’ – कु. स्नेहल गुब्याड

१४. चुकांविषयीची संवेदनशीलता आणि प्रायश्‍चित्त पूर्ण करण्याची तळमळ

अ. ‘ती सारणीत स्वतःकडून झालेल्या चुका लिहिते. ती तिच्याकडून झालेल्या चुका सर्वांसमोर सांगतेे. ती फलकावरही स्वतःच्या चुका लिहिते.’ – सौ. नेहा मेहता आणि कु. स्नेहल गुब्याड

आ. ‘पूर्वी कधी मनीषाताई सत्संगाला येऊ शकत नसल्यास भ्रमणभाषवर सूत्रे सांगायची. त्या वेळी प्रार्थनाही ‘मला माझ्या चुका सांगायच्या आहेत’, असे म्हणून चुका सांगत असे.’ – सौ. राजश्री खोल्लम

इ. ‘एकदा ती आमच्या घरी आल्यावर रात्री आम्ही सर्व जण एकत्र जेवायला बसतांना दूरदर्शन संच चालू केला. त्या वेळी तिचे दूरदर्शन संचावरील कार्यक्रम न पहाण्याचे प्रायश्‍चित्त असल्याने ती दूरदर्शन संचाकडे पाठ करून जेवायला बसली. एवढ्या लहान वयात प्रायश्‍चित्ताविषयी असलेले तिचे गांभीर्य आणि वागणे पाहून सर्वांनाच आश्‍चर्य वाटले. ‘ती मनावर कशी नियंत्रण मिळवत आहे’, हेही लक्षात आले.’ – सौ. राधा सोनवणे

१५. आध्यात्मिक स्तरावर रहाणे

‘तिच्या आईला पुष्कळ शारीरिक त्रास होतात. तेव्हा प्रार्थना कधी भावनिक झाली नाही. ‘देव काळजी घेतो’, असे ती म्हणते.’  – कु. स्नेहल गुब्याड

१६. भाव

१६ अ. रिंंगसारख्या वस्तूशी ‘ते श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र आहे’, या भावाने खेळणे : ‘आमच्या घरी एक प्लास्टिकचे कमळ आणि त्याखाली गोल रिंगसारखी वस्तू आहे. प्रार्थना घरी आल्यावर त्या रिंगशी खेळत असे. तेव्हा ‘ती सर्व सोडून हीच वस्तू का घेते ?’, असे मला वाटायचे. तिला विचारल्यानंतर ‘ते श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र आहे’, या भावाने ती खेळते’, असे तिने सांगितले.’ – सौ. राधा सोनवणे

१६ आ. ‘प्रार्थनाने निसर्गचित्र काढले. त्यात ‘नदी ही अत्तराची नदी आहे’, ‘घर हा रामनाथी आश्रम आहे’, ‘डोंगर कापराचा आहे’, असे तिने लिहिले होते.

१६ इ. प्रार्थना सुंदर नृत्य करते. ‘ती स्वतः कृष्णाची राधा आहे’, या भावाने नृत्य करते.’ – कु. स्नेहल गुब्याड

१६ ई. ‘प.पू. गुरुमाऊली आणि सद्गुरु स्वातीताई यांच्याप्रती तिच्या मनात अपार भोळा भाव आहे. तो तिच्या वागण्या-बोलण्यातून जाणवतो.’ – सौ. ज्योती दाते

१७. अनुभूती

१७ अ. प्रार्थनाचे देवीच्या वेशभूषेतील छायाचित्र पाहून ‘ती खरोखरच देवी आहे’, असे जाणवणे : ‘एकदा तिने शाळेतील स्नेहसंमेलनात एका लोकगीतावर आधारित नृत्यात सहभाग घेतला होता. त्यात तिने देवीच्या रूपाची वेशभूषा केली होती. तिचे त्या वेशभूषेतील छायाचित्र पाहून ‘ती खरोखरच देवी आहे’, असे मला जाणवत होते. तेव्हा तिच्या मुखावर मला वेगळेच तेज जाणवलेे.’ – सौ. नेहा मेहता

१७ आ. प्रार्थनाची वेणी घालतांना शांत वाटणे : ‘तिची वेणी घालायची संधी मला काही वेळा मिळाली. तेव्हा मला पुष्कळ शांत वाटायचे. माझ्याकडून कधी थोडे चुकल्यास ती कधी चिडली नाही. ‘वेणी किती छान घातली ग ताई’, असे ती म्हणायची. – कु. स्नेहल गुब्याड

१८. प्रार्थनाची आध्यात्मिक उन्नती झाल्याची जाणीव होणे

‘प्रार्थनाच्या कविता, आत्मनिवेदन आणि शिकायला मिळालेली सूत्रे लिहिलेल्या धारिका वाचतांना तिच्यातील प्रगल्भता आणि अनुसंधान वाढले असल्याचे जाणवले. ‘ती लवकरच संतपद प्राप्त करील’, असा विचार मनात येऊन आम्हाला आनंद होत होता.’ – सौ. नेहा मेहता, कु. स्नेहल गुब्याड आणि सौ. राजश्री खोल्लम (२३.८.२०२०)

कु. प्रार्थना महेश पाठक हिला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती 

१. हनुमानाच्या चित्राकडे पाहिल्यानंतर अकस्मात् भगवान शिवाचे दर्शन होणे आणि पुन्हा हनुमंताचे दर्शन होणे

‘रामनाथी आश्रमातील हनुमंताच्या चित्राकडे पाहून परीक्षण करायला सांगितले होते. त्या वेळी हनुमानाच्या चित्राकडे पाहिल्यानंतर मला अकस्मात् भगवान शिवाचे दर्शन व्हायचे आणि पुन्हा हनुमंताचे दर्शन व्हायचे. त्या चित्राकडे एकटक पाहिल्यास मला सभोवतीचे काही न दिसता ‘सर्वत्र निळा प्रकाश पसरला आहे’, असे दिसले. ‘हनुमान माझ्याकडे प्रेमाने बघून डोळ्यांची उघडझाप करत आहे’, असे मला जाणवले. मला ‘हनुमंताच्या चित्राकडे बघतच रहावे’, असे वाटत होते. ‘मला हे सर्व परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने अनुभवता आले’, त्यासाठी त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता !

२. गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी अकस्मात् मुखात ‘श्रीहरि’ असे नाम येणे आणि श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे

गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी (१०.८.२०२०) संध्याकाळी अकस्मात् माझ्या मुखात ‘श्रीहरि’ असे नाम येऊ झाले. त्यानंतर रात्री पुष्कळ वेळपर्यंत मी ते नाम वैखरीतून घेत होते. मला ते थांबवता येत नव्हते. तेव्हा मला त्या प्रत्येक क्षणी श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवत होते.’

– गुरुदेवांच्या चरणांवरील आनंदी फूल, कु. प्रार्थना महेश पाठक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.८.२०२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक