गुढीपाडव्याच्या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या चारचाकी वाहनाची पूजा करतांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या वाहनाची पूजा करतांना श्री. निनाद आणि सौ. तनुजा गाडगीळ

१. सद्गुरुद्वयींचा भ्रमणभाष येऊन गेल्यावर वातावरणातील मरगळ दूर होऊन उत्साह जाणवणे

श्री. निनाद गाडगीळ

​‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांचा भ्रमणभाष येण्याआधी वातावरणात थोड्या प्रमाणात निरुत्साह जाणवत होता. त्यांचा भ्रमणभाष झाल्यानंतर वातावरणात एकदम पालट झाला. हवेत गारवा निर्माण झाला आणि मरगळ दूर होऊन उत्साह आला.

२. देवतांचे आवाहन केल्यावर त्यांचे अस्तित्व जाणवणे

​वाहनाची पूजा चालू झाल्यावर हनुमान आणि श्रीविष्णु या देवतांचे आवाहन केल्यावर मनात कोणतेही विचार नव्हते. तेथे देवतांचे अस्तित्व जाणवत होते. पुरोहितांकडून सांगितलेल्या कृती सहज होत होत्या.

३. पूजा चालू झाल्यावर वातावरणात झालेले पालट पाहून सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना तिन्ही ऋतूंचे आशीर्वाद मिळाल्याचे जाणवणे

सौ. तनुजा गाडगीळ

​पूजा चालू झाल्यावर काही वेळ ऊन होते. त्यानंतर वातावरणात गारवा जाणवला आणि मंत्र चालू असतांना पावसाचे काही थेंबही पडले. त्या वेळी ‘ऊन, वारा आणि पाऊस या सगळ्यांनी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांना आशीर्वाद दिले आहेत आणि कोणत्याही ऋतूंमध्ये वाहन अन् सद्गुरु स्वातीताई यांना काहीच त्रास होणार नाही. तसेच वाहनाची पूजा होत असतांना तिन्ही ऋतूंची उपस्थिती होती’, असे आम्हाला जाणवले.

४. वाहनात चालकाच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवण्यास सांगितल्यावर ‘सर्वच साधकांच्या साधनेचे चाक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हातात आहे आणि तेच सर्व साधकांची काळजी घेणार आहेत’, असे जाणवणे

​वाहनदेवतेला आवाहन करतांना ‘वाहनात चालकाच्या जागी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि बाजूला प.पू. भक्तराज महाराज बसलेले दिसले. काही कालावधीनंतर वाहनाची दृष्ट काढतांना पुष्कळ अडथळे येत होते. त्या वेळी सद्गुरु

डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी वाहनचालकाच्या जागेवर परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र ठेवण्यास सांगितले. त्या वेळी मला आधी दिसलेल्या प्रसंगाची आठवण झाली. तेव्हा ‘सर्वच साधकांच्या साधनेचे चाक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याच हातात आहे आणि तेच सर्व साधकांची काळजी घेणार आहेत’, याची मला जाणीव झाली.

५. वाहनाची दृष्ट काढत असतांना ७ नारळ वाया जाणे, सद्गुरु गाडगीळकाकांनी गाडीवर उपाय करून नारळ वाढवल्यावर  ८ वा नारळ योग्य पद्धतीने फुटणे आणि त्या वेळी ‘श्रीविष्णूचा ८ वा अवतार भगवान श्रीकृष्णाने आशीर्वाद दिले आहेत’, असे जाणवणे

​वाहनाची दृष्ट काढत असतांना ८ वेळा नारळाने दृष्ट काढली. ७ वेळा नारळ फोडल्यावर प्रत्येक वेळी तो अयोग्य पद्धतीने फुटत होता. त्यामुळे सद्गुरु गाडगीळकाकांनी गाडीवर उपाय करून नारळ वाढवला. तेव्हा ८ वा नारळ योग्य पद्धतीने फुटला. श्रीविष्णूचा ८ वा अवतार हा भगवान श्रीकृष्ण आहे आणि आपत्काळात साधकांचे रक्षण भगवान श्रीकृष्णच करणार आहे. त्यामुळे ‘भगवान श्रीकृष्णानेही या वाहनाला नारळाच्या माध्यमातून आशीर्वाद दिले आहेत’, असे मला वाटले.

६. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी भ्रमणभाष करून पूजा चांगली झाल्याचे सांगितल्यावर ‘पूजा देवाच्या चरणी पोचली’, असे वाटणे

​पूजा संपल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी भ्रमणभाष करून पूजा चांगली झाल्याचे सांगितले. ‘त्या वेळी देवाने आम्हा उभयतांकडून करून घेतलेली पूजा त्याच्या चरणी पोेचली’, असे मला जाणवले. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी साक्षात् देवी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांचा काही क्षणांसाठी सत्संग आम्हाला लाभला. यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.

​सद्गुरु (कु.) स्वातीताई यांच्या चारचाकी वाहनीची पूजा करण्याची संधी गुरुकृपेने मिळाली आणि देवाने या अनुभूती दिल्या. यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. निनाद गाडगीळ आणि सौ. तनुजा गाडगीळ, सनातन संकुल, देवद, पनवेल. (८.४.२०२०)