‘खळखळता उत्साह, आनंद आणि चैतन्य यांची प्रीतीमय धारा, म्हणजे सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) ! त्या प्रीतीधारेत साधकांना न्हाहू घालून ‘श्रीगुरूंची कृपा कशी अनुभवायची ?’, हे शिकवणार्या सद्गुरुमाऊलीकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. सद्गुरु स्वातीताईंची अनुभवलेली मातृवत प्रीती
१ अ. झालेल्या चुकीमुळे खंत वाटून झोप लागत नसतांना प्रेमाने बोलून पाठीवरून हात फिरवून झोपायला घेऊन जाणार्या सद्गुरु स्वातीताई ! : एकदा माझ्याकडून एक गंभीर चूक झाली होती. सद्गुरु स्वातीताईंनी मला त्या चुकीची कठोर शब्दांत जाणीव करून दिली. त्यामुळे मला झोप लागत नव्हती; म्हणून मी रात्री २ वाजता खोलीतून उठून बाहेर येऊन गुरुदेवांना आत्मनिवेदन करत होते. तेव्हा सद्गुरु स्वातीताईही खोलीतून बाहेर आल्या आणि माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवून म्हणाल्या, ‘‘अग, झोप आता. विचार करू नकोस.’’ असे म्हणून त्या मला खोलीत घेऊन गेल्या.
१ आ. बरे वाटत नसतांना मातेच्या ममतेने स्वतः पातळ खिचडी करून खाऊ घालणारी प्रेमळ माऊली ! : मध्यंतरी उष्णता वाढल्याने मला डोकेदुखीचा पुष्कळ त्रास होत होता आणि घशात फोड आले होते. त्यामुळे मला काहीच खाता येत नव्हते. घास गिळतांनाही पुष्कळ वेदना व्हायच्या. हे सद्गुरु स्वातीताईंना कळल्यावर त्यांनी मला सेवा थांबवून विश्रांती घेण्यास सांगितले. त्यांना इतक्या सेवा असतांनाही त्यांनी माझ्यासाठी पातळ खिचडी केली आणि ती मला खाण्यास सांगितली.
१ इ. ‘रुग्णाईत साधकांना बरे वाटावे’, यासाठी आवश्यक ते सर्व साहाय्य करण्यास सांगणार्या सद्गुरु स्वातीमाऊली ! : सेवाकेंद्रातील साधक रुग्णाईत असतील, तेव्हा त्या मला सांगतात, ‘‘त्यांना काय होत आहे, ते पहा. आधुनिक वैद्यांशी तूच बोलून घे. त्यांना काय हवे, ते सर्व आपण करूया.’’ त्या सर्वच साधकांची पुष्कळ काळजी घेतात.
१ ई. सेवाकेंद्रातील साधकांना विविध पदार्थ करून खाऊ घालून आनंद देणारी प्रेमळ आई ! : सेवाकेंद्रातील साधक घरी जात नाहीत; म्हणून आपल्याकडे जे उपलब्ध आहे, त्यातून त्यांना चांगले पदार्थ करून देण्यास सांगून त्यांनी मला तसे नियोजन करून दिले. कधी कधी त्या स्वतःही सेवाकेंद्रातील साधकांसाठी वेगळा पदार्थ बनवतात.
२. समष्टीची तीव्र तळमळ !
२ अ. ‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी एकही दिवस खंड पडू न देता साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा घेणे : सोलापूर जिल्ह्यातील साधकांच्या साधनेची घडी बसण्यासाठी सद्गुरु स्वातीताई गेले वर्षभर प्रतिदिन व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. कधी त्यांची प्रकृती बरी नसेल, तरीही त्यांनी त्यात खंड पडू दिला नाही. एखाद्या साधकाचे साधनेचे चांगले प्रयत्न झाल्यावर त्या त्याचे कौतुक करतात आणि इतर साधकांना त्याच्याकडून शिकायला सांगतात, तसेच प्रयत्न न करणार्या साधकांना कठोर शब्दांत जाणीव करून देतात.
२ आ. ‘धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांचीही साधना व्हावी अन् त्यांना आनंद मिळावा’, यासाठी सातत्याने प्रयत्न करून त्यांना साधनाप्रवण करणे : ‘धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमी आणि साधना सत्संगातील जिज्ञासू यांचीही साधना होऊन ते लवकर साधक व्हावेत’, यासाठी सद्गुरु स्वातीताईंनी धर्मप्रेमींसाठी आठवड्यातील एक दिवस आणि जिज्ञासूंसाठी प्रत्येक शुक्रवारी ‘कृष्णलीला’ सत्संग चालू केला. या सत्संगात सद्गुरु स्वातीताई त्यांना ‘ते कुठल्या सेवा करू शकतात ?’, ते सांगतात आणि ‘त्या सेवा करतांना त्यांनी कसे प्रयत्न केले ? त्यातून त्यांना आनंद कसा मिळाला ?’, ही सूत्रे घेतात. त्यामुळे तेही कृतीशील झाले आणि त्यांनी सेवा करायला आरंभ केला. आता ते सेवेतील अडचणी किंवा प्रश्न विचारू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या साधनेलाही गती मिळाली. ‘आपल्याला सद्गुरु स्वातीताईंचा सत्संग मिळत आहे’, या विचारांनी त्यांनाही कृतज्ञता वाटून त्यांची भावजागृती होते.
‘सोलापूर सेवाकेंद्राची घडी बसावी आणि सर्व साधकांची साधना व्हावी’, यासाठी त्या सतत तळमळत असतात. ‘सर्व साधकांना आनंद मिळावा’, यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करतात. केवळ साधकांचीच नाही, तर ‘धर्मप्रेमींचीही साधना व्हावी’ यासाठी सद्गुरु स्वातीताई धर्मप्रेमींनाही संपर्क करतात. त्यांनाही सद्गुरु स्वातीताईंचा आधार वाटतो.
३. सद्गुरु स्वातीताईंनी साधनेविषयी सांगितलेली अनमोल सूत्रे !
३ अ. कृती आणि मन यांच्या स्तरावर करायचे प्रयत्न !
१. नियोजन होत नाही, म्हणजे तुम्ही विचारांच्या स्तरावरच रहाता. कृतीच्या स्तरावर प्रयत्न करा !
२. प्रतिक्रिया नको, तर चांगला प्रतिसाद द्या, म्हणजे परिस्थिती आपोआप पालटेल !
३. कुठलीही सेवा मनापासून केली, तर अष्टसात्त्विक भावापैकी एक तरी भाव जागृत होतोच आणि त्यातून आनंद अनुभवता येतो. त्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
४. सकारात्मक आणि वर्तमान स्थितीत राहून प्रयत्न केले, तर साधना घडेल ! : ‘माझे प्रयत्न चालू आहेत’, या विचारांनी किंवा ‘कुणी कौतुक केल्यावर त्या विचारांत राहिल्याने किंवा ‘माझ्याकडून चुका होतात. मला जमत नाही’, या नकारात्मक विचारांनी आपली साधना व्यय होते. त्यापेक्षा वर्तमानकाळात राहून सेवा आणि साधना केली, चुकांतून शिकलो, तर पुढे जाता येईल. अडचणींचाच विचार करत राहिलो, तर तीच साखळी वाढत जाईल. सकारात्मक राहिलो, तर साधना होईल. आपण आनंदी आणि सकारात्मक राहिलो, तर रुग्णाईत होणारच नाही.
५. इतरांच्या चुका पाहिल्यास साधना व्यय होते, त्यापेक्षा ‘मी साधनेत कुठे न्यून पडतो ?’, हे पाहिले पाहिजे ! : आपल्या चुका इतरांना विचारल्या पाहिजेत. ‘स्वतः कुठे न्यून पडतो ?’, याचे निरीक्षण झाले नाही, तर प्रगती होणार नाही. ‘आपले काय चुकले ?’, हे पाहिले, तर आपली साधना होईल. ‘दुसरा कसा चुकतो ?’, हे पहात राहिलो, तर आपली साधना व्यय होईल. ‘दिवसभरात आपली साधना किती झाली आणि व्यय किती झाली ?’, याचे सतत अवलोकन करायला हवे. साधक चुकला, तर त्याला साहाय्यही करायला हवे.
६. स्वतःला पालटण्याची तळमळ असावी ! : ध्येयाचा ध्यास लागला की, प्रगतीचे दार उघडते. आपली साधनेची आणि स्वतःला पालटण्याची तळमळ वाढली की, जग आपोआप पालटेल; पण त्यापूर्वी स्वतःला पालटायचे आहे.
७. ‘सेवेतून आपल्याला आणि इतरांनाही आनंद मिळतो का ?’, याचा अभ्यास करावा ! : ‘आपण जी सेवा करतो, त्यातून कशी स्पंदने येतात ? आपण मनापासून सेवा करतो का ? सेवा झाल्यावर त्यातून आपल्याला आणि इतरांना आनंद मिळतो का ?’, याचा अभ्यास करायला हवा, तर आपली साधना होईल.
३ आ. भावाच्या स्तरावर करायचे प्रयत्न !
१. प्रत्येक गोष्ट भावपूर्ण केली, तर सगळे देवच करतो. भावपूर्ण प्रयत्न केले, तर तोच पुढील साधनेचे प्रयत्न करवून घेईल. आपण भगवंताचे नाम सतत घेतले, तर आपण केलेल्या सेवेत देवच उतरेल अन् तोच सेवेत प्रकट होईल.
२. ‘परिपूर्ण सेवा करणे’, म्हणजेच भक्ती ! देवाला आर्ततेने हाक मारणे, म्हणजे भक्ती ! परिपूर्ण सेवा करणारा साधक गुरुदेवांचा उत्तम शिष्य होतो !
३. बाळ आईला कळकळून हाक मारते, त्या वेळी त्याला विश्वास असतो, ‘आई सर्व सोडून माझ्यासाठी येईल.’ तसे आपणही कळकळीने आणि श्रद्धेने भगवंताला हाक मारली, तर भगवंत धावून येईलच !
४. ‘श्रीकृष्ण माझ्या हृदयात आहे. तो अखंड माझ्या समवेत आहे’, अशी श्रद्धा असेल, तर आपल्याला तसे अनुभवता येईल आणि या श्रद्धेमुळेच आपण पुढील आपत्काळात तरून जाऊ शकू.
५. ताण येतो, तेव्हा श्रद्धा डगमगते. श्रद्धा असेल, तर ताण येणारच नाही !
६. प्रार्थना : ‘परम कृपाळू गुरुमाऊली, तुझेच स्वरूप असलेल्या सद्गुरु स्वातीताईंकडून शिकून तशी कृती करण्यास मी अल्प पडते. माझ्यातील स्वभावदोषांमुळे मला सद्गुरु स्वातीताईंना अपेक्षित असे घडता आले नाही. ‘गुरुमाऊली, तुला अपेक्षित असे मला घडता येऊन तुला प्रसन्न करून घेता येऊ दे’, हीच तुझ्या सर्वव्यापी चरणी प्रार्थना !’
– कु. दीपाली मतकर, सोलापूर (१८.३.२०२१)
सद्गुरु स्वातीताई, म्हणजे खळखळत वहाणारी आनंददायी नदी ।
सद्गुरु स्वातीताई, म्हणजे
खळखळत रहाणारी आनंददायी नदी ।
आम्हा साधकजनांना पावन करण्यास
ती सदैव वहात राही ॥ १ ॥
वाणीतूनी जणू निखळ परमात्म्याचे दर्शन आम्हा घडवी ।
दृष्टीतूनी करी वर्षाव गुरुकृपेचा आम्हा बालकांवरी ॥ २ ॥
निखळ वहाते ही नदी साधकांना गुरुकृपा मिळवूनी देण्या ।
शिकवते कृतीतूनी अडचणींच्या
डोंगर अन् दर्यांवरी मात करण्या ॥ ३ ॥
वाहत राही ही नदी आम्हा साधकांना श्रीगुरुचरणी नेण्या ।
स्वभावदोष अन् अहंनी
बरबटलेल्या साधकांना शुद्ध करण्या ॥ ४ ॥
वहात राही ही नदी महासागररूपी गुरुदेवांशी एकरूप होण्या ।
अन् आम्हा साधकांसी श्रीगुरुचरणांसी एकरूप करण्या ॥ ५ ॥
वाचकजन आणि धर्मप्रेमी
यांनाही साधनेची तृप्ती देण्या अखंड वहात राही ।
आणि स्वतःच्या निखळ हास्यातूनी
गुरुकृपेचा वर्षाव करी ॥ ६ ॥
निरपेक्षतेने वहात रहाते आम्हांवर प्रीतीचा वर्षाव करण्या ।
करते आर्त प्रार्थना श्रीगुरुचरणी
घडण्या तुमच्यासम अन् कृपा संपादन करण्या ॥ ७ ॥
– कु. दीपाली मतकर, सोलापूर (१८.३.२०२१)