मंदिरे सरकारच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी संतांना चळवळ उभारावी लागते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! केवळ तमिळनाडूतीलच नव्हे, तर भारतभरातील मंदिरे ही सरकारीकरणातून मुक्त करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य असून हिंदूंनी त्यासाठी कंबर कसणे आवश्यक !
नवी देहली – तमिळनाडूतील सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी १०० ट्वीट करत चळवळ चालू केली आहे.
१. जग्गी वासुदेव यांनी म्हटले आहे की, माझी ही चळवळ कुणावरही दबाव टाकण्यासाठी नव्हे, तर आत्यंतिक तीव्र वेदनांमुळे ही चळवळ चालवलेली असून त्यासाठी १०० ट्वीट करत आहे. समाजाच्या या यातनेचा आवाज ऐकलाच गेला पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीने दिलेल्या दुर्दैवी वारशामुळे तमिळनाडूमधील हिंदूंची मंदिरे अजूनही सरकारच्या अखत्यारीत आहेत. यामुळे वैभवशाली तमिळ परंपरेचा र्हास झाला आणि तिचा गळा घोटला गेला. एच्आर् अँड सीईच्या (हिंदू धार्मिक आणि धर्मादाय एंडोव्हमेंट्स विभागाच्या) अखत्यारीत राज्यातील ४४ सहस्र २२१ मंदिरे आहेत. १ लाख १२ सहस्र ९९९ मंदिरांना प्रतिदिन पूजेसाठी कोणताही महसूल नाही, असे मद्रास उच्च न्यायालयात सांगण्यात आले.
२. या ट्वीट्सह पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जग्गी वासुदेव यांनी म्हटले की, ही महान कला, तमिळ संस्कृतीचा आत्मा, तमिळ लोकांचे हृदय, तसेच भक्तीच्या मूळ स्रोताची अशी अवस्था पाहून हृदय पिळवटून निघते. आपली भाषा, कला आणि हस्तकला सर्वकाही जपले गेले ते या भक्तीमुळे. तमिळ असणारी प्रत्येक गोष्ट भक्तीमध्ये रुजलेली आहे आणि या भक्तीचा पाया ही मंदिरे आहेत. आज त्यांना अशा दयनीय अवस्थेत पाहून मनाला अतिशय वेदना होतात. आता या मंदिरांना बंधनमुक्त करण्याची वेळ आली आहे.