१. परात्पर गुरु डॉक्टरांनी मोठ्या संकटातून वाचवणे
‘मी परम पूज्यांच्या चरणी कृतज्ञता म्हणून हे कथन व्यक्त करत आहे. ‘परम पूज्य’ या शब्दाने आम्हाला प्रत्येक वेळेला आधार मिळत आहे. अनेक वर्षांपूर्वी आमच्या संपूर्ण कुटुंबावर संकट आले होते. त्या वेळी केवळ आणि केवळ परम पूज्यांमुळे आम्हाला स्थिर रहाता आले आणि आम्ही त्या संकटातून बाहेर पडू शकलो. परम पूज्यांनी आम्हाला बर्याच प्रसंगांतून वाचवले आहे.
२. एकदा पत्नीला ‘उगाच एवढे करतेस, तुझी आध्यात्मिक पातळी काही ६० टक्के होणार नाही,’ असे रागावून बोलणे आणि त्यानंतर काही दिवसांतच तिची ६१ टक्के पातळी घोषित घेणे
काकू (माझी पत्नी सौ. श्रुतिका मोरवाले) कधीच प्रतिक्रिया व्यक्त करत नसे. अनेक वेळा मी तिच्यावर अतिशय रागवायचो; पण ती कधीच उलट बोलली नाही. तिची पातळी घोषित होण्यापूर्वी थोडे दिवस आमचे भांडण झाले, म्हणजे मीच तिच्याशी भांडलो. ती गप्प होती. त्या वेळी मी तिला रागावून बोललो, ‘‘उगाच एवढे करतेस. तुझी आध्यात्मिक पातळी काही ६० टक्के होणार नाही.’’ त्यानंतर काही दिवसांतच तिची ६१ टक्के पातळी घोषित झाली आणि ती जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटली.
३. पत्नी विलंबाने घरी येणार म्हणून तिच्यावर पुष्कळ रागवायचे ठरवणे, नंतर ‘ती नक्कीच श्रीकृष्णाला प्रार्थना करणार आणि आपला राग निवळणार’, असा विचार मनात येणे आणि प्रत्यक्षातही तसेच घडणे
वर्ष २०१३ मध्ये आध्यात्मिक प्रगती झालेल्या साधकांचा सत्कार होता. त्या कार्यक्रमासाठी पत्नीसुद्धा कोथरूडला गेली होती. ती ७ वाजेपर्यंत घरी येणार होती; परंतु नंतर तिने घरी येण्यास विलंब होणार असल्याविषयी मला कळवले. तेव्हा मला तिचा राग आला. मनात विचार आला की, ती आज आल्यावर मी तिला चांगले रागावतो. थोड्या वेळात दुसरा विचार आला की, आता ही नक्कीच श्रीकृष्णाला प्रार्थना करणार आणि माझा राग निवळणार. त्यानंतर खरंच ती ९ वाजता आली. तोपर्यंत माझा राग निवळला होता. ती आल्यावर मी तिला पाणी आणि चहा दिला.
४. पत्नी नेहमी परात्पर गुरु डॉक्टरांना काकुळतीने प्रार्थना करत असे. तेव्हा तिच्या तोंडवळ्यावरील भाव पाहून माझी भावजागृती व्हायची.
५. रुग्णाईत असतांना भावसत्संग ऐकल्याने पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा होणे
२ वर्षांपूर्वी ती रुग्णाईत असल्याने ३ – ४ मास झोपून होती. त्या वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांची चौकट आली होती की, रुग्णाईत व्यक्तींनी भावसत्संग ऐकला, तर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल. त्यामुळे त्याच रविवारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंचा सत्संग चालू झाल्यावर मी तिला हळूहळू शयनगृहातून बैठकीच्या खोलीत चालवत आणले आणि सोफ्यावर झोपवले. जसा सत्संग संपत आला, तसे ती एकदम उठून बसली. दुसर्या दिवसापासून ती स्वयंपाकही बनवू लागली. ही अनुभूती नंतर तिने भावसत्संगात सांगितली होती. तेव्हा सद्गुरु ताईंनी भावसत्संगाचे चैतन्य आणि महत्त्व यांविषयी सांगितले होते.
६. पत्नीच्या आजारपणातही परम पूज्यांनी पुष्कळ सांभाळणे आणि तिचे निधन झाल्यावरही परम पूज्यांच्या कृपेने जराही दुःखाश्रू न येणे
आजारपणातही परम पूज्यांनी पत्नीला आणि आम्हाला पुष्कळ सांभाळले. तिचे निधन झाल्यावरही परम पूज्यांच्या कृपेने मला जराही दुःखाश्रू आले नाहीत. मयुरी (मुलगी) थोडी रडली; परंतु त्यानंतर ती लगेच स्थिर झाली. आम्ही रात्री दोघेच घरात होतो. त्या वेळीही परम पूज्यांच्या कृपेने स्थिर रहाता आले. दुसर्या दिवशी मनीषाताई (सौ. मनीषा महेश पाठक) यांच्याशी संपर्क झाल्यावर डोळ्यांतून आनंदाश्रू आले आणि भावजागृती झाली. ‘काकू (पत्नी) परम पूज्यांच्या चरणांपाशी गेल्या. आमच्या घरातून परम पूज्यांच्या घरात गेल्या. त्यात रडायचे काय ? आमच्या घराऐवजी परम पूज्यांच्या घरात त्या आनंदी असतील; कारण तिथे त्यांच्या समवेत साक्षात् परम पूज्य आहेत’, असे विचार मनात आले.
शेवटी प्रत्येकाला प्रारब्ध भोगायचे आहे. काकूंचे प्रारब्ध भोगून झाले असणार. प.पू. भक्तराज महाराज यांच्या सुवचनांमध्ये म्हटले आहेच ना, ‘प्रारब्ध या जन्मातच भोगावे लागते. नाहीतर दुसर्या जन्मात व्याजासकट भोगावे लागते.’ परम पूज्य म्हणजे प्रत्यक्ष ईश्वरच आहेत. त्यांनी ‘या दिवशी काकूंना आपल्याकडे बोलवायचे’, असे ठरवलेच होते. त्यामुळे काकू त्यांच्याकडे गेल्या. ‘आता परम पूज्य मला कधी बोलावणार आहेत’, याची मी वाट पहात आहे.
असे परात्पर गुरु सहस्रो जन्मांच्या पुण्याईने आपल्याला मिळाले आहेत. सहस्रो जन्म घेतले, तरी परम पूज्यांचे ऋण फेडता येणार नाहीत. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– गुरुचरणांकित,
श्री. दिलीप मोरवाले, पुणे (२३.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |