फेसबूकचे बनावट खाते सिद्ध करून सामाजिक माध्यमांचा वापर करणार्‍यांची लुबाडणूक करण्याचे गोव्यात वाढते प्रकार !

पोलिसांकडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती झाली, तशी गुन्हेगारीतही प्रगती झाली. त्यामुळे केवळ भौतिक प्रगती नव्हे, तर नैतिक प्रगतीही आवश्यक असल्याने समाजाला साधना शिकवण्याला पर्याय नाही !

पणजी, २३ मार्च (वार्ता.) – एखाद्या व्यक्तीचे बनावट फेसबूक खाते सिद्ध करून त्या माध्यमांतून संबंधित व्यक्तीच्या मित्रमैत्रिणींकडून पैसे उकळण्याच्या वाढत्या तक्रारी येत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सामाजिक माध्यमांचा वापर करणार्‍यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक माध्यमांचा वापर करणार्‍या अनेकांनी त्यांच्या फेसबूक खात्यावर बनावट खाते सिद्ध केल्याच्या तक्रारी केल्या आहेत. बनावट फेसबूक खाते सिद्ध करून त्याच्या माध्यमातून फेसबूक खातेधारकाच्या मित्रपरिवारांना ‘मनी रिक्वेस्ट’ (पैशांची मागणी) पाठवून पैसे उकळले जात आहेत. वैद्यकीय आपत्कालीन स्थिती किंवा अन्य काही तातडीच्या कामासाठी पैशांची आवश्यकता आहे, असा बहाणा करून सहस्रो रुपयांची मागणी करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक (सायबर गुन्हे विभाग) शोबित सक्सेना या प्रकरणी सामाजिक माध्यमांचा वापर करणार्‍यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करतांना म्हणाले, ‘‘सामाजिक माध्यमाचा वापर करणार्‍या एखाद्या व्यक्तीला त्याचा मित्र सामाजिक माध्यमातून संदेश पाठवून पैशांची मागणी करत आहे. असे जेव्हा घडते, तेव्हा संबंधित व्यक्तीला संपर्क साधून सामाजिक माध्यमातील संदेशाची प्रथम सत्यता पडताळणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे संबंधित व्यक्ती गोव्यातच रहात असल्यास त्याची वैयक्तिक भेट देऊन याविषयी सत्यता पडताळता येते. संदेशाची सत्यता पडताळल्याशिवाय किंवा संदेश सत्य असल्याची निश्‍चिती झाल्याशिवाय पैसे पाठवू नका. सामाजिक माध्यमाचा वापर करणार्‍याची फसवणूक होत असल्याचे आढळल्यास त्याविषयी थेट फेसबूककडे तक्रार करून बनावट फेसबूक खाते रहित करता येते. यासमवेतच सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार प्रविष्ट करता येऊ शकते.’’