सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागणारा, नेतृत्वगुण असलेला अन् परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अपार भाव असलेला कु. विश्‍व कृष्णा आय्या !

सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागणारा, नेतृत्वगुण असलेला अन् परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अपार भाव असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा रामनाथी, गोवा येथील कु. विश्‍व कृष्णा आय्या (वय १४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. विश्‍व कृष्णा आय्या हा एक आहे !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ –  परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘एकदा आमची एका संतांशी भेट झाली. त्या भेटीत एका साधिकेने संतांना सांगितले, ‘‘आश्रमातील बालसाधकांकडून स्वभावदोषांमुळे चुका होतात. कु. विश्‍वमध्येही तसे स्वभावदोष आहेत आणि विश्‍वला सध्या साधनेपेक्षा शिक्षण महत्त्वाचे वाटते आहे.’’ त्या वेळी संतांनी मला विचारले, ‘‘याविषयी तुम्हाला काय वाटते ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘ते त्याचे प्रारब्ध असेल !’’ यावर त्यांनी ‘हे बरोबर आहे’, असे सांगितले. 
कु. विश्‍व कृष्णा आय्या

नंतर कोरोना महामारीमुळे मार्च २०२० पासून दळणवळण बंदी चालू झाल्याने शाळा बंद झाल्या आणि परीक्षाही झाल्या नाहीत. त्या वेळी विश्‍वला ‘एवढे मास शाळेत जाऊन काहीच उपयोग झाला नाही, आपला वेळ वाया गेला’, असे सारखे वाटू लागले. शाळा नसल्यामुळे विश्‍व दिवसभर मोकळाच असायचा. त्यामुळे हळूहळू तो आश्रमातील काही सेवा स्वतःहून करू लागला. एकदा माझे त्याच्याशी झालेले बोलणे येथे दिले आहे.

१. हळूहळू विश्‍वला आश्रमसेवा करायला आवडू लागणे आणि त्याची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा दिसून येणे

सौ. सारिका आय्या

मी (त्याचे ‘हर्निया’चे शस्त्रकर्म झाले असल्याने ) : विश्‍व, तू अधिक जड वस्तू उचलू नको.

विश्‍व : अगं, काही होत नाही. परात्पर गुरु डॉक्टर आहेत ना ! तेच मला शक्ती देतात. तू मला म्हणतेस ना, ‘तू परात्पर गुरु डॉक्टरांचा आहेस’, मग कशाला काळजी करतेस ?

मी : असे असले, तरी क्रियमाणही योग्य प्रकारे वापरावे लागते.

विश्‍व : आपण केवळ साधनेचे क्रियमाण वापरायचे. बाकी परम पूज्य डॉक्टर बघतील.

२. विश्‍वने ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन केल्यावर त्यातून देशभक्तीची प्रेरणा घेऊन ‘आपणही असे सैनिक बनावे’, असा निश्‍चय करणे, त्याला ‘साधना आणि देवतांचे आशीर्वाद यांचे पाठबळ लागते’, असे सांगितल्यावर तो साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करू लागणे

दळणवळण बंदीच्या काळात विश्‍वने ‘दुसरे महायुद्ध’, ‘पानिपत’, ‘सहा सोनेरी पाने’, अशा ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन केले. त्यातून त्याने देशभक्तीची प्रेरणा घेतली आणि ‘मलाही असेच तत्पर सैनिक व्हायचे आहे’, असा निश्‍चय केला. तेव्हा मी विश्‍वला सांगितले, ‘‘देशभक्त सैनिकांप्रमाणे होण्यासाठी साधना करणेही महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सम्राट अशोक, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या सर्वांनी देवतांची उपासना केल्यामुळे त्यांना देवतांचे आशीर्वाद लाभले होते. त्याप्रमाणे देशभक्त सैनिक होऊन देशासाठी लढायला परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेली साधना करून त्यांच्या आशीर्वादाचे पाठबळ मिळवणे आवश्यक आहे.’’ हे लक्षात ठेवून त्याने ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांचा साधक आहे’, हा भाव ठेवून जोमाने साधनेचे प्रयत्न चालू केले.

३. विश्‍व करत असलेले साधनेचे प्रयत्न

३ अ. प्रथमच स्वतःची आध्यात्मिक पातळी पहाणे : गुरुपौर्णिमेच्या दिवशी साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित केली जाते. गुरुपौर्णिमा २०२० पर्यंत विश्‍वने कधीही स्वतःच्या आध्यात्मिक पातळीविषयी विचारले नाही. मी त्याला त्याविषयी सांगितले, तर ‘काय करायचे पातळीचे ?’, असे तो मला म्हणायचा; परंतु ‘या वर्षी त्याने माझी पातळी किती आहे ? ‘साधनेत पुढे जाण्याच्या दृष्टीने कसे प्रयत्न करायला हवेत ?’, हे कळण्यासाठी माझी पातळी बघतो’, असे म्हणून स्वतःची पातळी बघितली.

३ आ. चिंतन करणे : ‘साधनेत पुढे जाण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करायला पाहिजेत ?’ याचे चिंतन करून ते त्याने लिहून काढले आणि त्या दिशेने प्रयत्न चालू केले.

३ इ. आढावा देणे : साधना चांगली होण्याच्या दृष्टीने विश्‍वने ‘सेवा आणि व्यष्टी साधना यांचा आढावा देणे, नामजपादी उपाय भावपूर्ण करणे’, असे प्रयत्न वाढवले. तसे त्याने त्याचे दिवसभराचे नियोजनही केले.

३ ई. अंतर्मुख होणे : व्यष्टी आढाव्यात त्याच्या चुका सांगितल्यावर तो अंतर्मुख होतो. त्याला दिलेल्या दृष्टीकोनातून ‘अजून असे कुठे होते का ?’ असे तो मला विचारून घेतो आणि त्याप्रमाणे स्वयंसूचना सत्र करतो.

दळणवळण बंदीच्या काळात विश्‍वने केलेले साधनेचे प्रयत्न बघून ‘काळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांचा आशीर्वाद’, यांमुळे कुठल्याही स्वरूपाच्या प्रारब्धावर मात करता येते’, हे मला शिकायला मिळाले. ‘काळ हेच प्रारब्धाचे उत्तर आहे’, याची मला जाणीव झाली.

४. विश्‍वची जाणवलेली इतर वैशिष्ट्ये

४ अ. धर्माचरणी : शाळेत जातांना तो प्रतिदिन टिळा लावून आणि नीटनेटकेपणाने जातो.

४ आ. सर्वांशी आदराने वागणे : विश्‍वचे शिक्षकांशी आदरयुक्त बोलणे आणि मुलांशी मिळून मिसळून वागणे, यांमुळे शाळेतील शिक्षक त्याचे कौतुक करायचे. शाळेतील शिक्षक त्याला ‘सनातनचा साधक’ म्हणूनच ओळखायचे आणि अन्य मुलांना त्याचे उदाहरण द्यायचे.

४ इ. नेतृत्वगुण

४ इ १. शाळेतील कुठल्याही कार्यक्रमात तो आवर्जून सहभागी होतो. ‘त्याच्यात पुढाकार घेणे आणि नेतृत्व गुण आहे’, असे त्याच्या शाळेतील शिक्षकांनी सांगून त्याचे कौतुक केले होते.

४ इ २. वक्तृत्व

‘वन्दे मातरम्’ काल, आज आणि उद्या’ या गोवा राज्यस्तरीय परिसंवादात बोलणे : ऑगस्ट २०१९ मध्ये गोवा राज्यस्तरीय ‘वन्दे मातरम्’ काल, आज आणि उद्या’ या विषयावर झालेल्या परिसंवादात त्याच्या शाळेतून त्याची निवड झाली होती. त्या वेळी ‘एवढ्या मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धेत, मोठ्या व्यासपिठावर आणि सर्वांसमोर तो व्यवस्थित बोलू शकेल का ?’, याची मला निश्‍चिती वाटत नव्हती. मी त्याला याविषयी विचारल्यावर तो मला म्हणाला, ‘‘देवानेच मला ही संधी दिली असून यातून मला सनातन संस्थेचे ‘वन्दे मातरम्’ विषयीचे विचार समाजाला सांगता येतील.’’

४ इ ३. अयोग्य कृतींविषयी चीड असणे आणि त्यावर प्रबोधन करणे : त्याच्या वर्गातील मुलांनी २ – ३ वेळा छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु देवता यांच्याविषयी अयोग्य प्रकारे बोलून त्यांचा अवमान केला. तेव्हा विश्‍वने न घाबरता त्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज आणि देवता यांचे महत्त्व सांगून क्षमायाचना करायला लावली. हा प्रसंग नंतर मला त्याच्या शाळेतील शिक्षकांकडून समजला. मी त्याला याविषयी विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘त्या मुलांना धर्मशिक्षण नसल्याने ती असे बोलतात.’’ त्यातून त्याच्या मनात ‘अयोग्य कृतींविरुद्ध चीड आहे’, असे माझ्या लक्षात आले.

४ ई. मायेची आसक्ती न्यून होणे

१. सध्या तो रामनाथी आश्रमात निवासाला आहे आणि त्याला तेथेच रहाणे अधिक आवडते. काही दिवसांपूर्वी ४ – ५ दिवस माझा त्याच्याशी संपर्क झाला नाही. त्यामुळे मी त्याला संपर्क करून विचारले, ‘‘तुला आईची (माझी) आठवण झाली नाही का ?’’ त्या वेळी त्याने ‘‘आठवण आली असती, तर भ्रमणभाष केला असता ना !’’ असे उत्तर दिले. यावरून ‘त्याची मायेची आसक्ती न्यून झाली आहे’, असे माझ्या लक्षात आले. तो भ्रमणभाषवरही आवश्यक तेवढेच बोलतो.

२. त्याला मागील मासात शाळेत पारितोषिक घेण्यासाठी बोलावले होते; पण तो शाळेत जाऊन पारितोषिक घ्यायला सिद्ध नव्हता; कारण त्यामुळे ‘माझ्या सेवेवर परिणाम होईल’, असे त्याला वाटत होते. सद्य:स्थितीत साधना आणि सेवा सोडून अन्य काहीही करण्याची त्याची सिद्धता नाही.

४ उ. वर्तमान स्थितीत रहाणे

१. त्याच्या मनात कुणाविषयीही पूर्वग्रह नसतो. तो सर्वांशी मिळून मिसळून वागतो. आम्ही कुठेही गेलो, तरी तो वर्तमानात रहातो.

२. माझ्या सासरी आणि माहेरी विश्‍व एकटाच मुलगा आहे. त्यामुळे तो सर्वांचा पुष्कळ लाडका आहे; पण कुणी कितीही लाड केले, तरी तो त्यात अडकत नाही. आवश्यकतेप्रमाणे सर्वांशी वागतो. तो सतत वर्तमान स्थितीत असतो.

४ ऊ. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव : परात्पर गुरु डॉक्टरांना साधना करणारे साधक अधिक आवडतात; म्हणून ‘आता मला साधनाच करायची आहे’, असा त्याने दृढ निश्‍चय केला आहे. ‘मी परात्पर गुरु डॉक्टरांचा साधक आहे आणि साधकांप्रमाणे मलाही सेवेसाठी सदैव तत्पर रहायला पाहिजे’, असे तो म्हणतो.

५. विश्‍वविषयी जाणवलेली इतर सूत्रे

५ अ. विश्‍वच्या वेळी गरोदर असतांना ‘बाळानेे वेदपाठशाळेत शिक्षण घेऊन पुरोहित व्हावे’, असे वाटणे, तरी त्याचे व्यावहारिक शिक्षण व्हावे’, या विचाराने त्याला शाळेत घालणे; मात्र कोरोना महामारीमुळे शाळा बंद झाल्यावर त्याने वेदपाठशाळेत शिक्षण घेण्याचा निर्णय घेणे : मी विश्‍वच्या वेळी गरोदर असतांना आम्हाला ‘होणार्‍या बाळाने वेदपाठशाळेत शिक्षण घेऊन पुरोहित व्हावे’, असे मला वाटायचे. विश्‍वचे ३ र्‍या इयत्तेचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही रामनाथी आश्रमात येऊन पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ केला. त्या वेळी विश्‍वचे वय ८ वर्षे होते. ‘वेदपाठशाळेत शिक्षण घेता यावे’, या दृष्टीने त्याने व्रतबंध विधी (मुंज) करून घेण्याचा हट्ट करून तो पूर्ण करून घेतला; मात्र त्याचे व्यवहारातील शिक्षणही पूर्ण व्हावे; म्हणून आम्ही त्याला वेदपाठशाळेत न घालता त्याचे पुढचे शिक्षण चालू ठेवले. आता या वर्षी त्याने वेदपाठशाळेत शिक्षण घेण्यास आरंभ केला. यातून गर्भावस्थेत असतांना त्या जिवाची जी इच्छा असते, तीच इच्छा ते पुढे जाऊन पूर्ण करतात’, हे मला शिकायला मिळाले.

५ आ. विश्‍व लहान असतांना म्हणजे साधारण तीन-साडेतीन वर्षापर्यंत तीनदा हरवूनही मिळाला आहे.

६. संतांचे प्रत्यक्षात उतरलेले बोल !

काही वर्षांपूर्वी एका संतांनी विश्‍वला ‘तू आठवीनंतर साधनेला चांगला आरंभ कर’, असे सांगितले होते. त्यानुसार त्याचे इयत्ता ८ वीचे वर्ष संपले आणि त्याच्या साधनेला चांगला आरंभ झाला आहे.

७. विश्‍वमधील स्वभावदोष

न ऐकणे, मस्करी करणे, गांभीर्य नसणे, विसराळूपणा आणि अव्यस्थितपणा.

८. प्रार्थना

 ‘हे गुरुमाऊली, ‘तुम्हीच विश्‍वकडून साधना करवून घेऊन तुमच्या चरणी समर्पित करून घ्यावे’, हीच प्रार्थना !’

– सौ. सारिका कृष्णा आय्या (विश्‍वची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०२१)                             ०

कु. विश्‍वच्या धारिकेचे टंकलेखन करतांना झालेले त्रास

१. लिखाण करतांना मनात नकारात्मक विचार येणे

‘१८.१.२०२१ पासून मी कु. विश्‍वविषयीच्या लिखाणाचे टंकलेखन करण्यास आरंभ केला; परंतु टंकलेखन करण्यास आरंभ केल्यावर मला काहीच सुचायचे नाही. ‘लिखाण देऊन काय उपयोग?’, असे नकारात्मक विचार मनात यायचे. त्यामुळे लिखाण करण्यास टाळलेही जायचे.

२. पाठ आणि कंबर येथे तीव्र वेदना होणे अन् छातीवर पुष्कळ दाब येणे

१२.३.२०२१ या दिवशी मी टंकलेखन करायला आरंभ केला आणि मला पाठ अन् कंबर येथे तीव्र वेदना चालू झाल्या. छाती ते गळा या ठिकाणी पुष्कळ दाब निर्माण झाला होता.

३. नामजपादी उपाय केल्यावर लिखाण करता येणे

१४.३.२०२१ या दिवशी मी टंकलेखनाला आरंभ करताच मला ‘पुष्कळ शिंका येणे, डोळ्यांतून पाणी येणे, अंग गरम होऊन एकदम थकवा जाणवणे’, असे त्रास चालू झाले. त्या वेळी आध्यात्मिक त्रासांवर उपाय सांगणार्‍या साधिकेने मला एक घंटा ‘निर्गुण’चा नामजप करायला सांगितला. हा नामजप करून झाल्यावर मला लिखाण करायला जमले.

यापूर्वीही त्याच्याविषयी लिखाण देतांना मला असे त्रास झाले होते आणि या वेळेसही पुष्कळ त्रास झाले. विश्‍व परात्पर गुरु डॉक्टरांचा असल्याने त्यांनीच त्याचे लिखाण करवून घेतले. त्यासाठी कृतज्ञता !’

– सौ. सारिका कृष्णा आय्या, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.३.२०२१)


यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.    

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक