श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी केवळ १ सहस्र ५०० भाविकांना दिला जाणार प्रवेश !

दर्शनासाठी ‘ऑनलाईन’ बुकींग करणे आवश्यक ! – मंदिर समितीचा निर्णय

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने १७ मार्चपासून दिवसभरात ‘ऑनलाईन’ बुकींग करून येणार्‍या केवळ १ सहस्र ५०० भाविकांनाच दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. मागील काही दिवसांपासून ३ सहस्र भाविकांना प्रतिदिन मंदिरात प्रवेश देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते.

१५ मार्च या दिवशी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दक्षता म्हणून मंदिरात प्रवेश देण्यात येत असलेल्या भाविकांची संख्या न्यून करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली १६ मार्च या दिवशी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे बैठक घेऊन हा निर्णय देण्यात आला आहे.