सिंधुदुर्ग – जिल्ह्यात साजरे होणारे होळी, धूलिवंदन, शब-ए-बारात आदी उत्सवांनिमित्त आयोजित होणारे कार्यक्रम, काही निवडणुकांच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी यांच्याकडून होणारे कार्यक्रम, तसेच जिल्ह्यात होणारी उपोषणे, मोर्चे, निदर्शने, रस्ता बंद आंदोलने सुरळीत पार पडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यातील यात्रा, उत्सव साध्या पद्धतीने अधिकाधिक ५० व्यक्तींच्या मर्यादित संख्येत साजरे करण्यात यावेत. या ठिकाणी निर्बंधांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यात १५ मार्चपासून १९ मार्चच्या रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल, कुणालाही शारीरिक इजा होईल, समाजाच्या भावना दुखावतील, अशी कृत्ये करण्यास मनाई आहे. जिल्ह्यामध्ये ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे यांस मनाई आहे. ज्यांनी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग अथवा संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची अनुमती घेतलेली आहे, अशा व्यक्तींना धार्मिक कार्यक्रमांसाठी हा नियम लागू नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम
१९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.