… अन्यथा उत्तरदायी अधिकार्‍यांपैकी कुणालाही सोडणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालयाची अन्वेषण यंत्रणांना चेतावणी

 डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरण

मुंबई – अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणी आणखी किती काळ तुमचे अन्वेषण चालू रहाणार ? कर्नाटक राज्यात यानंतर झालेल्या विचारवंतांच्या हत्येचे खटलेही चालू झाले. आपल्या राज्यात अद्याप खटले का चालू झाले नाहीत ? आम्ही दोन्ही अन्वेषण यंत्रणांच्या कामाविषयी शंका घेत नाही; पण प्रामाणिकपणे प्रयत्न चालू असल्याचे दिसले पाहिजे, अन्यथा उत्तरदायी अधिकार्‍यांपैकी कुणालाही सोडणार नाही, अशी चेतावणी मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि विशेष अन्वेषण पथक यांना दिली. न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपिठापुढे १२ मार्च या दिवशी ही सुनावणी पार पडली. पुढील सुनावणी ३० मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या प्रकरणातील तपासाच्या प्रगतीचा अहवाल २ आठवड्यांत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या निवृत्तीनंतर अनेक मासांच्या कालावधीनंतर या नवीन खंडपिठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी निरीक्षण नोंदवतांना न्यायालयाने म्हटले, ‘‘अशाने लोकांच्या विश्‍वासाला तडा जातो. अशा संवेदनशील प्रकरणांत अन्वेषण गांभीर्याने होत आहे आणि खटलाही चालवला जात आहे, असा संदेश लोकांमध्ये जाणेही आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची दक्षता घेणेही आवश्यक आहे.’’