महाआघाडी सरकारचा अर्थसंकल्प जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारा आहे ! – नारायण राणे, नेते, भाजप

नारायण राणे, नेते, भाजप

मुंबई – नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाआघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा बनावट असून यात केवळ आकड्यांची हेराफेरी करण्यात आली आहे. हा जनतेच्या डोळ्यांत धूळ फेकणारा अर्थसंकल्प आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी १२ मार्च या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

ते पुढे म्हणाले की, राज्याच्या उत्पनात १ लक्ष ५४ सहस्र कोटी रक्कम अल्प जमा झाली. एकूण ४ लाख ३४ सहस्र ९८७ कोटी अंदाजे खर्च केला. गेल्या वर्षी उत्पन्न अल्प झाले, तर या वर्षी उत्पन्न तेवढे आले, हे कसे गृहित धरले. अर्थसंकल्पात महावितरणासाठी कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. उत्पादन शुल्कातील आकडे फुगवून दाखवण्यात आले आहेत. अर्थसंकल्पातील १ लाख कोटींपेक्षा अधिकची तूट सरकार कशी भरून काढणार ? मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची मुख्यमंत्र्यांना एवढी काळजी का ? भांडवली खर्च शून्य आहे. तिजोरीत खडखडाट आहे. उत्पन्न झाले नाही, तर तरतुदी कशा केल्या. सागरी महामार्ग करणार; पण १ रुपयांची तरतूद नाही. पुण्यासाठी मात्र तरतूद या वर्षी करण्यात येईल, असे वाक्य टाकले. अर्थसंकल्प पुणे केंद्रीत आहे.

राणे म्हणाले की, सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पात वित्तीय तूट कशी भरून काढणार ? ठाकरे सरकार कोरोना काळात उत्पन्न कसे वाढवणार आहे ? ठाकरे-पवार यांच्या आश्‍वासनांना किंमत नाही. अर्थसंकल्पात वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा धूळफेक करणारी आहे. केवळ घोषणा नको, तर कार्यवाही करा. या सरकारने अर्थसंकल्पाची माहिती देणारे पुस्तकही छापले नाही.

राज्यातील कोरोनाचा विचार केल्यास देशातील ६० टक्के कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. एम्.पी.एस्.सी. परीक्षेने सावळा गोंधळ घातला आहे. एम्.पी.एस्.सी. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची अजूनही भरती नाही.